मनसे नेते बाळा नांदगावकर,दिलीपबापू धोत्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली होती मागणी
पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर, मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
याची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर शहरातील 136 वर्षापासून मानवी विष्ठा उचलणाऱ्या मेहतर समाजातील 213 कुटुंबांच्या गृहप्रकल्पास विशेषबाब म्हणून मंजुरी दिली असून पंढरपूर शहरातील बंद असलेले सर्व नगरपालिका दवाखाने सुरू करण्यास संबंधित विभागाला आदेश दिले असल्याची माहिती मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी दिली.
गेल्या 136 वर्षापासून पंढरपूर येथे मेहतर समाज राहत असून या समाजाने मानवी विष्ठा हाताने उचलून पंढरपूर शहर आणि चंद्रभागा वाळवंट स्वच्छ ठेवण्याचे काम काही काळ मेहतर समाजाने केले आहे.
आज देखील संपूर्ण पंढरपूर शहर स्वच्छ करण्याचे काम या समाजातील लोक करत असून या समाजातील कुटुंबांना राहण्यासाठी घरे नाहीत. ही सर्व कुटुंब आज देखील नगरपालिकेच्या जागेत पत्र्याच्या घरात राहत असून या समाजाच्या वतीने घरासाठी वारंवार आंदोलने करण्यात आली परंतु अद्याप पर्यंत या समाजाला न्याय दिला गेला नाही. या समाजासाठी घरे देण्यासंदर्भात हायकोर्टाने आदेश देऊन देखील नगरपालिकेने जाणून बुजून दुर्लक्ष केलेले आहे.
या समाजाच्या निवासस्थानासाठी नगरपालिकेकडे डी. पी. आर.प्लॅन तयार असून गेल्या 136 वर्षापासून नगरपालिकेच्या हद्दीतील जागेत हा समाज एकाच ठिकाणी राहत आहे. वारंवार शासन दरबारी बैठक होऊन देखील या समाजाला अद्याप पर्यंत न्याय मिळाला नसून हा समाज निस्वार्थपणे भाविकांना चांगल्या सुविधा पुरवत आहे.
तरी कृपया आपण स्वतः जातीने लक्ष घालून पंढरपूर शहरातील मेहतर समाजाच्या गृह प्रकल्पास मंजुरी द्यावी तसेच तीर्थक्षेत्र असल्याने मोठ्या संख्येने भाविक येत असतात तसेच पंढरपूर शहरात एक शासकीय उपजिल्हा रुग्णालय असून त्या रुग्णालयामध्ये रोज ग्रामीण भागातून आणि शहरी भागातून नागरिक उपचारासाठी येत असून त्यामुळे या उपजिल्हा रुग्णालयावर प्रचंड ताण पडत असून त्या ठिकाणी रुग्णांची रोज गर्दी होत असते त्यामुळे अनेक रुग्णांची त्या ठिकाणी गैरसोय होत आहे.
पंढरपूर नगरपालिकेचा दवाखाना सुरू असताना त्या दवाखान्याच्या माध्यमातून पंढरपूर शहरातील आणि शहरांत येणाऱ्या भाविकांची खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सोय होते रुग्णावर चांगले उपचार देखील केले जात होते.
पंढरपूर शहरातील नागरिकांचे आजारी पडण्याचे प्रमाण खूप कमी होते,परंतु गेल्या तीन वर्षापासून नगरपालिकेचा दवाखाना बंद केलेला आहे.
हा दवाखाना कशासाठी बंद केला ते आज पर्यंत कळलेले नाही? नगरपालिकेच्या दवाखान्यासाठी जागा उपलब्ध असून पंढरपूर नगरपालिकेकडे नागरिक कर देखील जास्त भरत आहेत. त्यामुळे आर्थिक अडचण नसून नगरपालिकेच्या तिजोरीतील पैसा ठेकेदारांना जगवण्यासाठी वापरण्यापेक्षा गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी आरोग्यासाठी वापरण्यात यावा यामुळे गोरगरीब जनतेला मदत होईल. यामध्ये लक्ष घालून बंद असलेला नगरपालिकेचा दवाखाना त्वरित सुरू करण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावेत अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली होती. याची तात्काळ दखल घेऊन संबंधित विभागांना आदेश दिले असल्याची माहिती दिलीपबापू धोत्रे यांनी दिली.