पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर शहरा लगत असलेल्या गोपाळपूर ग्रामपंचायतच्या नव्याने बांधण्यात येणाऱ्या ग्रामसचिवालय इमारतीचे भूमिपूजन उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते व युवक नेते भगीरथ भालके, युवक नेते प्रणव परिचारक, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, सोमनाथ आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके हे होते.
यावेळी बोलताना उद्योजक राजाभाऊ खरे म्हणाले की पंढरपूर नंतर गोपाळपूर या ठिकाणी यात्रेदरम्यान भाविक भेट देत असतात. येथील ग्रामसचिवालय बांधण्यासाठी निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करून विशेष बाब म्हणून १ कोटी ४२ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. याचबरोबर पंढरपूर मंगळवेढा रोड ते स्वेरी कॉलेज या रस्त्यासाठी दीड कोटी रुपये उपलब्ध करून दिले असून पुढील काळात गोपाळपूर येथील मंदिरासाठी मोठा निधी आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
ते पुढे बोलताना म्हणाले की मी मोहोळ मतदार संघात निवडणूक लढवण्यासाठी काम करत आहे.
यासाठी मी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून मोठा निधी आणला आहे. कोणतेही पद नसताना राजकारणामध्ये काम करण्याची इच्छा असल्यास काहीही होऊ शकते. त्यासाठी दानत पाहिजे नागरिकांनी माझ्या पाठीशी राहिल्यास विकासासाठी कोणतीही अडचणी येणार नसल्याचा विश्वास उपस्थित ग्रामस्थांना दिला.
यावेळी युवक नेते प्रणव परिचारक यांनी राजाभाऊ खरे यांनी मोहोळ मतदार संघातील अनेक कामे मार्गी लावली असल्याचे सांगत. यांच्यासारखा दबंग नेत्याची साथ मिळाल्याचे उद्गार काढत राजाभाऊ यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी भगीरथ भालके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाच्या सुरुवातीला कै. माजी आमदार औदुंबरअण्णा पाटील, कै. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या कार्यकाळात कोणताही भेदभाव न करता गोपाळपूर आणि परिसरात झालेल्या कामांना उजाळा दिला.तसेच विकास कामांसाठी कायम एकत्र येणाऱ्या गोपाळपूर येथील ग्रामस्थांचे कौतुक केले.
यावेळी त्यांनी गोपाळपूर ग्रामपंचायत साठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राजू खरे यांचे आभार मानले.
यावेळी व्यासपीठावर बी.पी रोंगे, दिनकरभाऊ मोरे, हरीशदादा गायकवाड, वसंतनाना देशमुख, राजूबापू गावडे, दिलीप गुरव, वामनतात्या बंदपट्टे, माऊली हळनवर, चंदाताई तिवाडी, प्राध्यापक सुभाष मस्के व गोपाळपूर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
यावेळी प्रस्तावनेत सरपंच विलास मस्के यांनी ग्रामसचिवालयासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खरे यांचे आभार मानले.
यानंतर प्रा. सुभाष मस्के यांनी विलास मस्के यांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांची माहिती उपस्थित ग्रामस्थांना दिली.