पंढरपूर /प्रतिनिधी
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मान्य होत नसल्याने सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती मराठा आंदोलकांनी आखली आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात मराठा समाजाच्या वतीने उमेदवार उभे करण्याचा निर्णय अनेक जिल्ह्यात घेण्यात आला आहे.
याची अंमलबजावणी करण्यासाठी सोलापुरात रविवारी सकल मराठा समाजाची बैठक पार पडली.
यामध्ये सरकारला विरोध करण्यासाठी आंदोलनाचा भाग म्हणून सोलापूर लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक गावातून दोन ते चार असे शेकडो उमेदवार मराठा समाजाच्या वतीने लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचा निर्णय झाला असल्याचे सकल मराठा समाजाचे नेते किरण घाडगे यांनी सांगितले.
ते पुढे बोलताना म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरंगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभे करण्यात आले आहे. शांततेच्या मार्गाने लाखोच्या संख्येने मोर्चे काढून मराठा समाजाने आंदोलन केले आहे. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही उलट मराठा समाजावर दबाव आणण्यासाठी देशात प्रथमच या सामाजिक आंदोलनाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानमंडळात केली आहे.मराठा आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत. मराठा विरोधात ओबीसी असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत सरकारला विरोध करण्यासाठी आंदोलनाचा एक भाग म्हणून शेकडो उमेदवार सकल मराठा समाज लोकसभा निवडणुकीत उभे करणार असल्याचे किरण घाडगे यांनी सांगितले