पंढरपूर/प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीपूर्वीच मंगळवेढा उपसा सिंचनाचा वाद पेटला होता. तालुक्यातील 24 गावांच्या पाणी प्रश्नावर तोडगा काढावा यासाठी नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावर आमदार प्रणिती शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच प्रणितीताई शिंदे यांनी गावातील ग्रामस्थांची प्रत्यक्ष भेट घेऊन यावर तोडगा काढण्याच्या आश्वासन दिले होते. दरम्यान, आमदार प्रणिती शिंदे यांच्या मंगळवेढ्या तालुक्यातील गाव भेटीने प्रशासन खडबडून जागे झाले असून बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे अखेर प्रणिती शिंदे यांच्या दबावापुढे एकप्रकारे सरकार झुकल्याचे पाहायला मिळाले आहे.
गेल्या 50 वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला अखेर राज्य सरकराने मंजूरी दिली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मान्यता देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी असणाऱ्या 24 गावांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
2009 च्या निवडणुकीपासून पेटलेला पाणी प्रश्न
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मंत्रिमंडळाने अखेर मंजुरी मिळावी म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांनी सातत्याने पाठ पुरवा केला होता. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले असून त्यांनी मंगळवेढेकरांना दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला आहे. गेल्या 50 वर्षापासून मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता. मुळात 2009 च्या लोकसभा निवडणुकीतही हा प्रश्न पेटला होता. त्यावेळीदेखील या टंचाईग्रस्त गावातील नागरिकांनी सुशीलकुमार शिंदे यांना विरोध करत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे हत्यार उपसले होते.अखेर आज प्रणिती शिंदे यांच्यामुळे मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लागला आहे. दरम्यानच्या काळात तत्कालीन आमदार भारत नाना भालके यांनी म्हैसाळ योजनेचं पाणी तालु्क्यात आणलं. मात्र 24 गावांचा पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेलेला नव्हता. परंतु त्याच कालावधीमध्ये 2024 च्या निवडणुकीत भाजपने मंगळवेढ्याच्या पाणी प्रश्नाचे राजकारण करत मते मिळवली होती. परंतु त्यावर दोन टर्म निवडणुका झाल्या मात्र, भाजपच्या खासदारांनी या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.
याच पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेवर तोडगा काढण्याची मागणी या 24 गावातील ग्रामस्थांनी केली होती. नसेल तर आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. तसेच ही 24 गावे कर्नाटकात समाविष्ट होण्याचा निर्णय घेणार असल्याचाही इशारा या ग्रामस्थांनी दिला होता. दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघातील एकमेव विरोधी पक्षाच्या आमदार असलेल्या प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढ्यातील तहानलेल्या 24 गावांना उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातदेखील आवाज उठवला होता. त्यानंतर सातत्याने प्रणिती शिंदे यांच्याकडून मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे काम मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवण्यात आला होता.
नुकताच त्यांनी मंगळवेढा तालुक्यात गावभेट दौरा केला असता, त्यांना पाटकळसह इतर काही गावात उपसा सिंचन योजनेवरून प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी देखील प्रणिती शिंदे यांनी मी मतं मागायला नाही तर तुमचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठीच आले आहे. मी विरोधी पक्षातील एकमेव आमदार असून मी हाती घेतलेले काम सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या नाकावर टिच्चून पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी मंगळवेढे करांनी देखील त्यांना साथ दिली होती.
अखेर प्रणिती शिंदे यांच्या एका दौऱ्यातच सरकारला खडबडून जाग आली असनू आज (बुधवारी) तातडीने मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवेढा उपास सिंचन योजना अखेर मंजुरी देण्यात आली आहे. हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील एकमेव विरोधी पक्षाच्या आमदार असलेल्या प्रणिती शिंदे यांचे मोठे यश मानले जात आहे.
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेतील कायम दुष्काळी 24 गावे खालीलप्रमाणे आहेत
खूपसंगी , लेंडवे चिंचळे , शिरशी , गोणेवाडी , लक्ष्मी दहिवडी , आंधळगाव , खडकी , जुनोनी , पाटकळ , येड्राव , जित्ती , जाळीहाळ , हाजापुर , सिद्धन्केरी , खवे , भाळवणी , निंबोणी , रड्डे , गणेशवाडी , हिवरगाव , मेटकरवाडी , शेलेवाडी , भोसे , नंदेश्वर या गावांना सातत्याने पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. मात्र आज आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या ग्रामस्थांचा पाणी प्रश्न सुटणार म्हणून पुन्हा एकदा आशा पल्लवित झाल्या आहेत.