पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाचे भूमिपूजन मराठा समाजाचे नेते स्वर्गीय आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योतीताई मेटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिजामाता जिजाऊ उद्यान व पद्मावती उद्यान विकसित करणे या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील,भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत, युवराज पाटील, प्रणिताताई भालके, माजी नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी बोलताना ज्योतीताई मेटे म्हणाल्या की मी जिजाऊची लेक म्हणून या कार्यक्रमाला उपस्थितीत आहे. विठ्ठलाच्या पावन नगरीत होणाऱ्या मासाहेब जिजाऊ यांच्या स्मारकाचे काम दर्जेदार करण्यात यावे. जेणेकरून येथे येणाऱ्या भाविकांना पाहता येईल अशी अपेक्षा व्यक्त करत राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केले.
यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी १ कोटी निधी प्रशासनाने दिला असल्याचे सांगितले. याचबरोबर पंढरपूर येथील राजमाता जिजाऊ उद्यानासाठी ४ कोटी आणि पद्मावती उद्यानासाठी १ कोटी निधी शासनाने दिल्याबद्दल आभार मानले.
यावेळी शिवसेनेचे शिवाजी सावंत यांनी आयोजकांचे आभार मानत सावंत कुटुंबाकडून स्मारकास निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन दिले.
याप्रसंगी अभिजीत पाटील, प्रणिताताई भालके, साधनाताई भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.
शेवटी पंढरपूर नगरपालिकेचे प्रभारी अधिकारी, प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या स्मारकाचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी ब्रिगेडचे नेते, माजी नगरसेवक किरणराज घाडगे यांनी केले.
यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले,माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, दीपक वाडदेकर, विनोदराज लटके, संतोष कवडे, दिगंबर सुडके, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर, सुधीर भोसले, सुनिल सर्वगोड, नागेश यादव, सतीश मुळे यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.