आचारसंहितेचं उल्लंघन केले असल्याचा काँग्रेचे प्रवक्ते अतुल लोंढे यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
पंढरपूर/प्रतिनिधी
सोलापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तक्रार काँग्रेचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. भाजपा नेते फडणवीस आणि सातपुते यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता देशभरात लागू झाली आहे. मात्र उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. आणि त्यांना गृहमंत्री पदावरून हटवलं जावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केलीय.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आयोजित एका बैठकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार राम सातपुते यांनी गृहमंत्री फडणवीस यांना फोन करत मोची समाजातील काही व्यक्तींवर कोविड कालावधीत दाखल करण्यात गुन्हे मागे घेण्यासाठी विनंती केली. यावर गृहमंत्री फडणवीस यांनी गुन्हे मागे घेण्याबाबत आश्वासन दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
त्यामुळे अशाप्रकारे एका समाजाच्या बांधवाना आश्वासित करून अशा पद्धीतने प्रलोभन देणं, आश्वासन देणं हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप लोंढे यांनी केला आहे.
काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सातपुते यांच्या व्हायरल व्हिडिओ संदर्भात गृहमंत्री यांना प्रश्न विचारले आहेत. आजपर्यंत या समाजातील व्यक्तींवरील गुन्हे मागे का घेतले नाहीत ?निवडणुकीच्या काळात या गुन्ह्यांची आठवण कशी झाली? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. गुन्हे मागे घेण्यासाठी निवडणुकीची वाट पाहात होता काय? असाही थेट सवाल अतुल लोंढे यांनी फडणवीस यांना विचारला आहे.