मातंग समाज स्वतंत्र उमेदवार देण्याच्या तयारीत
पंढरपूर/प्रतिनिधी
सोलापूर लोकसभेसाठी भाजपने माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिल्याने या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मतदारांची संख्या असलेल्या मातंग आणि बौद्ध समाजामधुन नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.या नाराजीचा फटका भाजपला निवडणुकीत बसण्याची शक्यता निमार्ण झाली आहे.
सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात मातंग आणि बौद्ध समाजाचे मतदान मोठ्या प्रमाणावर असल्याने यावेळी भाजप मातंग किंवा बौद्ध समाजाला उमेदवारी देणार असे दिसून येत होते.
त्यामुळे या निवडणुकीसाठी भाजपकडून मातंग समाजातील उद्योजक पद्मश्री मिलिंद कांबळे व संघ परिवाराशी निगडित असलेले प्रा.चांगदेव कांबळे, अधिकारी सुनील वारे आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे सर यांची नावे चर्चेत होती.त्याचबरोबर बौद्ध समाजाचे राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांचेही नाव चर्चेत होते. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे यांना उमेदवारी द्यावी अशीही मागणी केली होती.
लातुरचे तिकीट बौद्ध समाजाला दिलेले आसल्यामुळे सोलापुर लोकसभेचे भाजप चे तिकीट मातंग समाजाती
पद्मश्री मिलिंद कांबळे, अधिकारी सुनिल वारे, प्रा. चांगदेव कांबळे यानां मिळेल अशी खात्री शेवटपर्यंत वाटत होती. भाजपकडून मातंग समाजाला पहिल्यांदाच उमेदवारी मिळणार असल्याने मातंग समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र भाजपने अखेर मातंग समाजाला ही उमेदवारी न देता उशिरा माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली.भाजपने मातंग समाजाला उमेदवारी न दिल्याने मातंग समाजामध्ये भाजपाबद्दल प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर उमेदवारी न दिल्याने बौध्द समाजही भाजपवर नाराज झाला आहे. तसेच माळशिरसचे उत्तम जानकर यांना भाजपकडून उमेदवारी द्यावी अशी मागणीही धनगर समाजाच्यावतीने करण्यात आली होती. मात्र त्यांनाही उमेदवारी न दिल्याने धनगर समाजही नाराज असल्याचा जाणकारांचे म्हणणे आहे.
मातंग समाजाला उमेदवारी नाकारल्याने संतप्त झालेल्या सकल मातंग समाजाच्यावतीने मागील आठवड्यात पंढरपूर येथे निषेध व्यक्त करण्यात आला होता. आत्तापर्यंत मातंग समाजाला लोकसभा व राज्यसभेची उमेदवारी भाजपने दिली नसल्याने भाजपाबद्दल समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मातंग समाजाने सोलापूर लोकसभा मतदारसंघात मातंग समाजाचा स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय घेतलल्याचे समजते आहे. या निर्णयाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजामध्ये उमटू लागले असल्याने याचा फटका संपूर्ण महाराष्ट्रात भाजपला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी ही आमदार राम सातपुते यांच्या उमेदवारीवर नाराज आहेत. इच्छुकांना विश्वासात न घेता व उमेदवारी निवडताना मुलाखती न घेता भाजपने अचानक राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर केल्याने विशेष करून मातंग, बौद्ध आणि धनगर समाजामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. मातंग समाजाला सनदी अधिकाऱ्याच्या लोकसभेच्या उमेदवारीच्या द्वारे एक राज्यभर हुशार असे नेतृत्व मिळाले असते अशी समाजामधून मोठी अपेक्षा होती असे सामाजातील होत असलेल्या चर्चेमधून समजते.