प्रफुल्ल कदम यांनी तब्बल 13 लोकसभा मतदार संघातील जनतेला घातली पाण्याची शपथ
प्रफुल्ल कदम यांनी देवेंद्र फडवणीस यांचे आश्वासन केले जनतेसमोर व्हायरल
विठ्ठलाच्या नामदेव पायरीवर केला शासन निर्णय अर्पण
उजनी मायनस होण्याला भाजपचे दोन पालकमंत्री आणि काही आमदार जबाबदार : प्रफुल्ल कदम यांचा आरोप
पंढरपूर/प्रतिनिधी
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिनांक १७ एप्रिल २०१९ रोजी अकलूजच्या प्रचार सभेत लाखो लोकांच्या समोर पंतप्रधानांच्या साक्षीने भाजपा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाटा- कोयनेचे पाणी दुष्काळी भागातील जनतेला देतो असे उघड आश्वासन दिले होते.
हेच आश्वासन त्यांनी दि. १७ ऑक्टोबर २०१९ रोजी पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या वेळी दौंडच्या सभेत दिले होते.
आज पाच वर्षे झाली तरी त्यांनी यासाठी काहीही काम केलेले नाही. त्यांनी जर काम केलं असतं तर पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, नगर, सांगली,सातारा,बीड या जिल्ह्यातील जनतेला आज टंचाईकाळात पाणी मिळालं असतं. त्यांनी हा विषयच गांभीर्याने घेतला नाही. केवळ निवडणुकीपुरती त्यांनी आश्वासन देऊन जनतेची फसवणूक केली आहे. यासाठी आम्ही या पाण्याची शपथ घालून जनतेला भाजपा उमेदवारला मतदान करू नका म्हणून उघड प्रचार करणार असल्याचे पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत किसान आर्मी व वॉटर आर्मीचे नेते आणि टाटा-कोयना पाणी संघर्ष समितीचे नेते प्रफुल्ल कदम यांनी जाहीर केले आहे.
यावेळी बोलताना प्रफुल्ल कदम म्हणाले की माझ्या सततच्या आंदोलनानंतर आणि माझ्या अभ्यासपूर्ण पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने दि. २ ऑगस्ट २०१८ रोजी ‘हे पाणी आमचं’ या माझ्या पुस्तकाच्या आधारे शासन निर्णय पारित केला आहे. या शासन निर्णयाच्या आधारे भाजपा सरकारकडून जनतेला आश्वासन देण्यात आले होते. तथापि पाच वर्षे होऊनही यावर शासनाने काहीच काम केले नाही, केवळ निवडणुकीच्या प्रचारासाठी माझ्या विषयांचा वापर केलेला आहे. ही बाब गंभीर आहे. सदर शासन निर्णय प्रफुल्ल कदम यांनी विठ्ठलाच्या नामदेव पायरीवर अर्पण केला आहे.
आज उजनी मायनस होण्याचे कारण सुद्धा भाजपचे दोन पालकमंत्री व कालवा सल्लागार समितीचे काही भाजपा आमदार असल्याचा त्यांनी उघड आरोप केला आहे.
खरं तर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन कायदा २००५ च्या कलम २४ नुसार आणि क्रिमिनल ब्रिज ऑफ ट्रस्ट कलमानुसार हा गंभीर गुन्हा आहे.
असा गुन्हा करणाऱ्या लोकांना मतदान करू नका असे उघड आवाहन त्यांनी केलेले आहे.
टाटा- कोयनेचे तब्बल ११६ टीएमसी समुद्राला वाहून जाणारे स्वच्छ व शुद्ध पाणी हे महाराष्ट्रातील पुणे, शिरूर, मावळ, बारामती, सातारा, सांगली, माढा, सोलापूर, उस्मानाबाद, नगर, बीड या सर्व लोकसभा मतदारसंघातील हक्काचे पाणी आहे.
टाटांच्या सहा धरणातील ४८.९७ टीएमसी पाणी हे थेट उजनी धरणात येणारे पाणी आहे. तर कोयनेचे ६७.५ टीएमसी अवजल हे टेंभू, म्हैशाळ, उरमोडी, जिहे कटापूर आदी सर्व उपसा सिंचन प्रकल्पातून सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांना मिळू शकणार आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.
(दि. 17 एप्रिल 2019 रोजी अकलूज च्या सभेमध्ये आणि दि. 17 ऑक्टोबर 2019 ला दौंडच्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी टाटा-कोयनेचे पाणी दुष्काळी भागाला देतो हे जे उघड आश्वासन दिले होते त्याचे रेकॉर्डिंग प्रफुल्ल कदम यांनी जनतेसाठी व्हायरल केले आहे.)