पंढरपूर- ‘विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन पुढे नोकरीबरोबरच उद्योग व्यवसायामध्ये करिअर करावे. उद्योग- व्यवसाय करताना त्याला बुद्धी कौशल्याची जोड द्यावी. अभियांत्रिकी शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बौद्धिक उर्जा अधिक प्रमाणात मिळत असते. व्यावसायिक उद्योगधंद्याच्या पार्श्वभूमीवर अभियांत्रिकीचे शिक्षण हे सर्वात सरस असून यातील ज्ञानाचा व्यवहारात विशेष उपयोग होतो. म्हणून अभियांत्रिकी शिक्षणाचा फायदा हा भविष्यात नोकरी व उद्योगाच्या दृष्टीने प्रत्येक क्षेत्रात होतो. यासाठी करिअर करताना अडचणी आल्यानंतर त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा आणि हे करताना कठोर परिश्रमाची देखील नितांत गरज आहे.’ असे प्रतिपादन मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रातील टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर अँड कोलॅबोरेशन विभागाचे प्रमुख डॅनिएल बाबू यांनी केले.
भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई आणि श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी), पंढरपूर यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी भाभा अणुसंशोधन केंद्राचे डॅनीअल बाबू आणि सायंटिफिक ऑफिसर श्रीमती भारती भालेराव हे स्वेरीच्या प्राध्यापकांना मार्गदर्शन करत होते. प्रास्ताविकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता व स्वेरीच्या सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.पी.एम. पवार यांनी या सामंजस्य करारातून होणारे फायदे आणि संशोधनासाठी मिळालेला आत्तापर्यंतचा निधी याबाबत सविस्तर माहिती दिली. संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून ‘स्वेरीच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे, महत्वपूर्ण मानांकने, विद्यार्थ्याना केंद्रबिंदू मानून देण्यात येणाऱ्या शिक्षणात राबविण्यात येणारे विविध उपक्रम, संशोधन विभागाची गरुड झेप, भाभा अणुसंशोधन केंद्र आणि स्वेरी यांच्या मधील परस्पर सहकार्य व सामंजस्य याबाबत माहिती दिली. पुढे मार्गदर्शन करताना श्रीमती भालेराव म्हणाल्या की, ‘स्वेरीचा कॅम्पस पाहता डॉ. रोंगे सरांचे ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोलाचे योगदान असल्याचे स्पष्ट होते. त्यांच्या नेतृत्वामुळे सहकाऱ्यांना एक वेगळी उर्जा येते. भाभा अणुसंशोधन केंद्रासोबतच्या या करारामुळे विद्यार्थी, शेतकरी व कृषी विभागात तंत्रज्ञानाचे जाळे गतीने पसरणार आहे. हा उपक्रम विश्वसनीय असून याचा पाठपुरावा करणे हे महत्वाचे आहे.’ यावेळी ग्रामीण उद्योजकतेला चालना देणे यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) व स्वेरी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असल्याचे डॅनीअल बाबू यांनी सांगितले. यापूर्वी सन २०११ मध्ये ‘शिक्षक दिना’चे औचित्य साधून बीएआरसी व स्वेरी यांच्यात पहिला करार झाला होता. या करारामुळे स्वेरीतील ‘ग्रामीण मानव संसाधन विकास केंद्रा’च्या माध्यमातून ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. भाभा अणुसंशोधन केंद्रासोबतच्या या करारातून व नॅशनल नॉलेज नेटवर्कच्या माध्यमातून पंढरपूर परिसरातील ५ शाळा वायफाय द्वारे कनेक्ट केल्या गेल्या होत्या. ‘स्वेरी’ मध्ये ‘ग्रामीण मानव संसाधन विकास केंद्र’ (आर.एच.आर.डी. एफ.) ची निर्मिती करण्यात आल्याने समाजोपयोगी आणि ग्रामीण उद्योजकता वाढविण्याच्या हेतूने तसेच उपयोगी तंत्रज्ञान ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते. या प्रयोगाचे यश पाहता यंदा पुन्हा एकदा हा सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक यांना नक्कीच फायदा होणार आहे. तसेच या करारामुळे बीएआरसीचे विविध तंत्रज्ञान श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट पंढरपूर (स्वेरी) ला हस्तांतरित करण्यात आले. यावेळी स्वेरी अंतर्गत असलेल्या बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, संशोधन आणि विकास अधिष्ठाता डॉ.ए.पी.केने, इंजिनिअरिंग व फार्मसीचे प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता व स्वेरीच्या सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. पी.एम. पवार यांनी आभार मानले.
Related Stories
May 5, 2024