अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथे महायुतीची जाहीर सभा संपन्न
सोलापूर / प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे विकासपुरुष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी विकासाची गंगा आणली आहे, असे प्रतिपादन भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केले. लोकसभा निवडणूकीनिमित्त अक्कलकोट विधानसभेतील जेऊर या गावी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपाचे तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, पंचायत समितीचे माजी सभापती विलास गव्हाणे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय देशमुख, राम हुक्केरी, मल्लिकार्जुन बामणे, नंदकुमार सोनार, शरणप्पा चौलगी, दयानंद उंबरजे, विलास गव्हाणे, राम दुलंगे, खंडपण्णा वग्गे, ज्योती उन्नद, शिवप्पा देसाई आदी उपस्थित होते.
भाजपा आणि महायुतीचे आमदार राम सातपुते म्हणाले, यंदाची लोकसभा निवडणूक विकासपुरुष नरेंद्र मोदी विरुद्ध विकासाला विरोध करणाऱ्या काँग्रेसचे राहुल गांधी अशी आहे. मोदी सरकारकडून सोलापूर जिल्ह्यात ४० हजार कोटींची रस्त्यांची कामे सुरू आहेत. जल जीवन मिशनच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. रेल्वेस्थानक, विमानतळाचा विकास करण्यात येत आहे. प्रभू श्रीरामाच्या मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. ही निवडणूक देशाच्या आणि धर्माच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. गावोगावी भाजपाला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहता यंदाच्या निवडणुकीत सोलापूरकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासालाच मत देणार असल्याचे दिसून येत आहे, असेही आमदार राम सातपुते म्हणाले.
आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये श्री अयोध्येतील श्रीराम मंदिर, उज्जैन येथील श्री महाकाल मंदिर, श्री काशीविश्वेश्वराचे मंदिर, रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण, पाण्यासाठीच्या योजना करण्यात आल्या आहेत. ६५ वर्षे कोणताही विकास न करणारी काँग्रेस १० वर्षांचा हिशोब मागत आहे. ६५ वर्षांमध्ये मोठे राष्ट्रीय महामार्ग का झाले नाहीत याचे उत्तर काँग्रेसने द्यावे असेही आमदार सचिन कल्याणशेट्टी याप्रसंगी म्हणाले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीनिमित्त शुक्रवारी दहिटणेवाडी, चपळगाववाडी, हालहल्ली (अ), कर्जाळ, कोन्हाळी, ब्यागेहल्ली, हंजगी, वसंतराव नाईक नगर, समर्थ नगर, दोड्याळ या गावांचा भाजपा व महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा गाव भेट दौरा झाला. गावागावांमध्ये नागरिकांनी औक्षण करून हलगीच्या कडकडाटात फटाक्यांची आतिषबाजी करत भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे जंगी स्वागत केले. सर्व गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विकासाला पाठिंबा देत भाजप व महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. याप्रसंगी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.