पंढरपूर/प्रतिनिधी
शिवसेनेचे नेते उद्योजक राजू खरे यांनी आपली राजकीय ताकद मोहोळ विधानसभा मतदार संघात वाढविली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ, पंढरपूर आणि उत्तर सोलापूर भागात खरे यांना मानणारा मोठा वर्ग तयार झाला आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार आ. प्रणिती शिंदे यांनी आवर्जून गोपाळपूर येथील फार्महाऊसवर जाऊन रविवारी दुपारी राजू खरे यांची भेट घेतली. आ. प्रणिती शिंदे यांचा पंढरपूर ग्रामीण भागात गावभेट दौरा सुरू आहे. अशातच त्यांनी राजू खरे यांना आपल्याला या निवडणुकीत साथ देण्याबाबत विनंती केली आहे. त्यासाठी खरे समर्थक कार्यकत्यांनी जवळपास सहमतीही दर्शविली आहे. राजू खरे हे मागील ३३ वर्षांपासून कट्टर शिवसैनिक आहेत. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आहेत. तरीही काँग्रेसच्या उमेदवार आ. प्रणिती शिंदे यांनी भेट घेतल्याने खरे यांच्या राजकीय ताकदीला महत्त्व प्राप्त झाले आहे. महायुतीचे उमेदवार आ. राम सातपुते यांनी उमेदवारी मिळताच सोलापूर जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व आमदार आणि नेत्यांची भेट घेतली होती. मात्र, राजू खरे यांना अद्याप भेटले नाहीत. त्यामुळे खरे समर्थक कार्यकर्त्यांमधून नाराजी पसरली होती. याचाच फायदा उठविण्यासाठी आ. प्रणिती शिंदे यांनी घेतलेल्या भेटीमुळे खरे समर्थक कार्यकर्त्यांची मानसिकता बदलली आहे. या भेटीदरम्यान तृती खरे यांनी आ. प्रणिती शिंदे यांचा सत्कार केला.