पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपुरात आज सोमवारी दुपारी झालेल्या महायुतीच्या मेळाव्यास आयोजकाकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याचा आरोप करत सभेच्या आयोजकावर कारवाई करावी अशी लेखी स्वरूपाची तक्रार पंढरपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी यांनी पंढरपूर येथील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षाकडे केली आहे.
यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील श्रेयश पॅलेस येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सोलापूर व माढा मतदारसंघ पदाधिकारी व शिवसैनिक कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सोलापूर लोकसभा मतदार संघाचे भाजपा उमेदवार राम सातपुते याचबरोबर शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, सोलापूर शिवसेना संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, भाजपा जिल्हा अध्यक्ष चेतनसिंग केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा संपन्न झाला.
या मेळाव्याच्या आयोजकांनी निवडणूकची आचारसंहिता असतानाही कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचा आरोप करत
या मेळाव्याच्या आयोजकावर कारवाई करण्याची मागणी पंढरपूर काँग्रेस शहर अध्यक्ष अमर सूर्यवंशी यांनी पंढरपूर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कक्षेकडे केली आहे.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारी मध्ये त्यांनी आचारसंहितेच्या कायद्याचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले असून या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.