भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचे प्रतिपादन : दलित बांधवांनी केले जोरदार स्वागत
सोलापूर /प्रतिनिधी
गरीब – श्रीमंत, स्त्री – पुरुष असा कोणताही भेदभाव न करता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान अधिकार दिले आहेत. त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच आज मी लोकसभेचा उमेदवार आहे, असे प्रतिपादन भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केले.
न्यू बुधवार पेठ येथील बॉबी चौक परिसरात भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, अजित गायकवाड, माजी नगरसेविका वंदना गायकवाड उपस्थित होते.
आमदार राम सातपुते म्हणाले, झोपडपट्टीतील युवकांना का मिळण्यासाठी काँग्रेसने आजवर काहीही प्रयत्न केले नाहीत. सोलापुरातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी भविष्यकाळात आम्ही प्रयत्न करू. काँग्रेस पक्षाचे नेते भाजपा संविधान बदलणार आहे अशी भीती नागरिकांना घालतात. काँग्रेस पक्षाकडे इतर कोणतेही विकासाचे मुद्दे नसल्यानेच ते अशी असत्य विधाने करत आहेत. दीन दलितांची सेवा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने मला लोकसभेची उमेदवारी दिली आहे. सोलापूरकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोलापूरचा सर्वांगीण विकास करू असे अभिवचनही भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी दिले.
माजी नगरसेविका वंदना गायकवाड म्हणाल्या, विरोधी पक्षांचे लोक येऊन दलित बांधवांना अनेक आमिषे दाखवतील. परंतु दलित बांधवांनी त्याला बळी न पडता सजगपणे भारतीय जनता पक्षाच्या समर्थनार्थ भूमिका घ्यावी, असेही माजी नगरसेविका वंदना गायकवाड यावेळी म्हणाल्या.