पंढरपूर काँग्रेस शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी यांनी केली होती निवडणूक कक्षाकडे तक्रार
पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपुरात सोमवारी दुपारी झालेल्या महायुतीच्या मेळाव्यास आयोजकाकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याचा आरोप करत सभेच्या आयोजकावर कारवाई करावी अशी लेखी स्वरूपाची तक्रार पंढरपूर काँग्रेसने पंढरपूर येथील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षाकडे केली होती.याची तात्काळ दखल घेऊन कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना शहर प्रमुख विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर व माढा मतदारसंघ पदाधिकारी व शिवसैनिक कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन पंढरपूर येथील श्रेयश पॅलेस येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सोलापूर लोकसभा मतदार संघाचे भाजपा उमेदवार राम सातपुते याचबरोबर शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, सोलापूर शिवसेना संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, भाजपा जिल्हा अध्यक्ष चेतनसिंग केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा संपन्न झाला.
या मेळाव्याच्या आयोजकांनी निवडणूकची आचारसंहिता असतानाही कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचा आरोप करत कारवाई करण्याची मागणी पंढरपूर काँग्रेसने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कक्षेकडे केली होती.
याप्रकरणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आचारसंहितेच्या कायद्याचा भंग केल्याप्रकरणी शिवसेनेचे शहर प्रमुख विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.