सोलापूर/प्रतिनिधी
गुढीपाडव्याच्या निमत्ताने सोलापुरात हिंदू नववर्ष महोत्सव समितीच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभा यात्रेत सहभागी होत सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच उपस्थित नागरिकांशी संवाद साधून हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये हिंदू नववर्ष उत्सव समितीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी अयोध्येतील प्रभू श्री रामाच्या प्रतिकात्मक मूर्तीचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी महविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते हे आमनसामने आले. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीराम, जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने शोभा यात्रेचा परिसर दणाणून सोडला.
दरम्यान, प्रणिती शिंदे यांनी थेट नागरिकांमध्ये जात त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला. तसेच हिंदू संस्कृती प्रमाणे यावेळी त्यांनी उपस्थित महिलांसोबत फुगडीचा फेर धरत त्यांनी महिलांची मने जिंकली.
यावेळी प्रणिती शिंदे यांनी शोभायात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच हे नववर्ष सुखाचे, समृद्धीचे जावो आणि सर्वांच्या आशा,आकांक्षा पूर्ण होवोत, अशी मनोकामनाही व्यक्त केली. तसेच येणाऱ्या काळात सोलापूरच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त करत विजयाची गुढी उभारू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी प्रणिती शिंदे यांची उपस्थिती पाहून शोभा यात्रेतील महिला आणि युवतींनी त्यांच्याभोवती गर्दी करत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी अनेक महिला, तरुणींना प्रणितीताई शिंदे यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.
दरम्यान, या शोभा यात्रेवेळी प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते महेश कोठे, विनोद भोसले, शोभा यात्रेचे आयोजक ज्ञानेश्वर मायकल, उत्सव समितीचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, रंगनाथ बंग, चिदानंद मुस्तारे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते