आमदार राम सातपुते यांनी दिली ‘जय मार्कंडेया’ ची घोषणा
सोलापूर / प्रतिनिधी
थेट जनतेत जाऊन लोकसंपर्कावर भर देणारे भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी रविवारी पूर्व भागातील मार्कंडेय उद्यान येथे मॉर्निंग वॉकवेळी नागरिकांशी संवाद साधला. यानंतर वल्याळ ग्राउंड येथे तरुणांसोबत क्रिकेट खेळताना आमदार राम सातपुते यांनी षटकार मारताच नागरिकांनी ‘अबकी बार चारसो पार’ च्या घोषणा दिल्या.
मार्कंडेय उद्यान येथे येताच तेथील नागरिकांनी आमदार राम सातपुते यांचे उत्स्फूर्त स्वागत करीत टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी आमदार राम सातपुते यांनी ‘जय मार्कंडेया’ अशी घोषणा देताच नागरिकांनीही ‘जय मार्कंडेया’ म्हणत त्यांना प्रतिसाद दिला. यावेळी महिला – भगिनी, ज्येष्ठ नागरिक यांनी आमदार राम सातपुते यांच्याशी संवाद साधत त्यांना सोलापूरकरांच्या अपेक्षा सांगितल्या. आगामी काळात सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित प्रयत्न करु असे अभिवचन आमदार राम सातपुते यांनी नागरिकांना दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर आणि सक्षम नेतृत्वावर आमचा विश्वास असून त्यांच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
यानंतर भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी वल्याळ ग्राउंड येथे तरुणांची संवाद साधला. क्रिकेट खेळण्यासाठी जमलेल्या तरुणांच्या आग्रहाखातर त्यांच्यासोबत क्रिकेट, हॉलीबॉल खेळून या तरुणांचा उत्साह आमदार राम सातपुते यांनी वाढवला. यावेळी आमदार राम सातपुते यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती. आमदार राम सातपुते मैदानात येताच शेकडो युवक त्यांच्याभोवती एकत्र होऊन ‘जय श्रीराम’, ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम,’ ‘अब की बार चारसो पार’ अशा घोषणा देत होते. ते शेताचे निर्णय खंबीरपणे घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच साथ देणार असल्याचे युवकांनी सांगितले.