शहर मध्य विधानसभा मतदारसंघात वाढला भाजपचा जोर
सोलापूर / प्रतिनिधी
गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये शहर मध्य मतदारसंघातील जनतेने भाजपला मताधिक्य दिले आहे. शहर मध्य मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे, असे प्रतिपादन भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केले.
लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान रविवारी भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शहर मध्य मतदारसंघात झंझावाती दौरा केला. जागोजागी त्यांचे झालेले स्वागत, कार्यकर्त्यांकडून, नागरिकांकडून उस्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करत, ढोल ताशांच्या गजरात, फेटा बांधून जागोजागी आमदार राम सातपुते यांचा सन्मान करण्यात येत होता. ‘अबकी बार चारसो पार’, ‘फिर एक बार मोदी सरकार’, ‘भारतमाता कि जय’, ‘जय श्रीराम’ अशा घोषणा नागरिक उत्स्फूर्तपणे देत होते.
दरम्यान रविवारी आमदार राम सातपुते यांनी रामलाल चौक, कोनापुरे चाळ, काडादी चाळ, रामवाडी सेटलमेंट, मोदी हुडको सोनी नगर, महावीर चौक मुर्गी नाला, सात रस्ता, मल्लिकार्जुन नगर, पाथरूट चौक, घिसाडी गल्ली, तेलंगी पाछा पेठ आदी परिसरातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या भेटी घेऊन संवाद साधला.
सोलापूर लोकसभा निवडणुकीतील राजकीय संघर्ष उत्तरोत्तर वाढत चालला आहे. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आमदार असलेल्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघाला भाजपा आणि माहितीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सुरुंग लावल्याचे बोलले जात आहे.
भाजपाच्या कार्यालयीन कर्मचाऱ्याला
वाहिली आदरांजली
भाजपचे कार्यालयीन कर्मचारी भगवान तिमण्णा म्हेत्रे यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या २५ वर्षांपासून भाजपाचे कार्यालयीन कर्मचारी असलेल्या भगवान म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन आमदार राम सातपुते त्यांना आदरांजली वाहिली.