सोलापूर/प्रतिनिधी
विकासकामांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना निवडून द्या, असं आवाहन माजी आमदार दिलीप माने यांनी केले आहे. नान्नज, गावडी दारफळ, भागाईवाडी, कौठाळी, साखरेवाडी, कळमण, पडसाळी, वांगी, रानमसले बीबी दारफळ, अकोलेकाटी, कारंबा येथे आमदार प्रणिती शिंदे यांचा गावभेट दौरा झाला. यावेळी माजी आमदार दिलीप माने बोलत होते.
यावेळी दिलीप माने म्हणाले, भाजपने तीन लोकसभा निवडणुकीमध्ये तीन वेळा उमेदवार बदलले आहेत. कारण, त्यांनी काहीच काम केले नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर जनतेसमोर कसे जाणार हा प्रश्न होता. भाजपला अक्षरशः तोंड लपवण्याची वेळ आली आहे. महागाई वाढली आहे, डिझेल पेट्रोलचे दर वाढले, गॅस दर वाढला, खते व औषधांच्या किमती वाढल्या आहेत. बेरोजगारी वाढली आहे, अच्छे दिन आनेवाले म्हणत सर्वसामान्य सुशिक्षित बेरोजगार झाले आहेत. शेतकरी, युवक, महिला वर्ग यांच्यावर बुरे दिन आणले आहेत, अशी टीका यावेळी माने यांनी केली आहे.
दरम्यान, प्रत्येक ठिकाणी महागाई वाढल्यामुळे मतदारांच्या मनात भाजपविरुद्ध मोठ्या प्रमाणात रोष आहे. दरम्यान, आमदार प्रणिती शिंदे यांनी विकासकामे केल्यामुळे त्या सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. त्यामुळे सोलापूरच्या विकास कामांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना निवडून देण्याचे आवाहन माजी आमदार माने यांनी केले आहे. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.