भाजपा आणि महायुतीचे प्रचंड मोठे शक्ती प्रदर्शन : सातपुते, निंबाळकरांचा अर्ज भरण्याच्या मिरवणुकीस हजारोंची गर्दी
सोलापूर / प्रतिनिधी
भाजपा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी….. महापुरुषांना भक्तीभावाने केले जाणारे अभिवादन आणि नागरिकांचा प्रचंड जल्लोष असा त्रिवेणी संगम मंगळवारी सोलापूरकरांनी अनुभवला. भाजपा व महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि माढा लोकसभेचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय संकल्प रॅलीद्वारे ढोल ताशांच्या गजरात प्रचंड मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले.
छत्रपती श्री संभाजी महाराज चौकातून विजय संकल्प रॅलीला सुरुवात झाली. प्रारंभी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. विजय संकल्प रॅलीतील सजवलेल्या रथावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उमेदवार आमदार राम सातपुते खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर, खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, माजी सहकारमंत्री आ. सुभाष देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार यशवंत माने, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार शहाजी पाटील, माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे, प्रशांत परिचारक, भाजपाचे ज्येष्ठ नेते किशोर देशपांडे, भाजपाचे लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदारसिंह केदार, लोकसभा निवडणूक प्रमुख शहाजी पवार आदी होते.
या विजय संकल्प रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांती संघटना, जनसुराज्य पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या पक्षांचे झेंडे घेऊन, शेले परिधान करून सहभागी झाले होते. सजवलेल्या रथावर तसेच कार्यकर्त्यांकडे भाजपा आणि महायुतीतील सर्व घटक पक्षांचे झेंडे फडकत होते.
रथाच्या पुढे आणि मागे हजारो कार्यकर्ते जल्लोषात, घोषणा देत चालत होते. छत्रपती श्री संभाजी महाराज चौकातून सुरू झालेली विजय संकल्प रॅली छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, मेकॅनिक चौक, सरस्वती चौक, चार हुतात्मा पुतळा येथे विसर्जित झाली. विजय संकल्प रॅली दरम्यान धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूरचे चार हुतात्मे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. विजय संकल्प रॅली चार हुतात्मा पुतळा येथे आल्यानंतर या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. या रॅलीमध्ये हजारो कार्यकर्ते आणि नागरिक आदी सहभागी झाले होते.
नागरिकांनी केले उत्स्फूर्त स्वागत
भाजपा आणि महायुतीच्या विजय संकल्प रॅलीच्या मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. रांगोळ्या काढून पुष्पवृष्टी करत ‘फिर एक बार मोदी सरकार’, ‘अब की बार चारसो पार’, ‘जय श्रीराम’, ‘जय भवानी जय शिवराय’, ‘भारतमाता की जय’ आदी घोषणांचा जयघोष नागरिक आणि कार्यकर्त्यांमधून अखंडपणे सुरू होता. नागरिकांनी केलेले हे स्वागत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कामांना दिलेली पावतीच आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केली.
नियोजन आणि नागरिकांच्या प्रतिसादाची दिसली चुणूक
भाजपा आणि महायुतीच्या मंगळवारी झालेल्या विजय संकल्प रॅलीतून भाजपा आणि महायुतीच्या निवडणुकीच्या नियोजनाची आणि सोलापूरकरांच्या प्रचंड प्रतिसादाची चुणूक दिसून आल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.