सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार राम सातपुते यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे सादर केला.
तसेच माढा लोकसभेसाठी भाजपा आणि माहितीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांनी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका ठाकूर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खा. रणजितसिंह नाईक – निंबाळकर, भारतीय जनता पार्टीसह महायुतीमधील मित्रपक्षांचे पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आमदार राम सातपुते म्हणाले, आपल्या सोलापूरची भूमी अभिमानाची भूमी आहे. या जिल्ह्याच्या मातीत अनेक व्यक्तीमत्व आजवर घडली आणि त्यांना जनतेने मनापासून स्वीकारले आहे. अशा सोलापूरच्या भूमीची सेवा करण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर लोकसभेचा महायुतीचा अधिकृत उमेदवार या नात्याने मला दिली. त्यांचा हा विश्वास ठरविण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहीन. सोलापूर जिल्ह्यातील तमाम मायबाप जनतेला, भारतमातेच्या सेवेसाठी शहीद झालेल्या या भूमीतील शूरवीरांना, सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकाला व व्यक्तीला मनापासून वंदन करतो. सोलापूरातील जनता माझ्यावर विश्वास ठेवून सर्वांची सेवा करण्याची संधी मला देतील यात शंका नाही.
या उमेदवारीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील सर्व आराध्य दैवते व शक्तिपीठांच्या आशीर्वादाने मी सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सोलापूरकरांच्या सेवेसाठीचे पहिले पाऊल टाकले आहे, असेही आमदार राम सातपुते याप्रसंगी म्हणाले.
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी सोलापूरकरांच्या सेवेसाठी बळ देण्याची प्रार्थना श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी केली. त्यांच्या दर्शनाने एक ऊर्जा मिळाली, असे भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यावेळी म्हणाले.