सोलापूर / प्रतिनिधी
काही जणांना ही निवडणूक आमदार राम सातपुते विरुद्ध शिंदे, खासदार रणजीतसिंह नाईक – निंबाळकर विरुद्ध मोहिते अशी आहे असे वाटते. परंतु लोकसभेची ही निवडणूक विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. या निवडणुकीत जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा व महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि माढा लोकसभेचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज मंगळवारी भरण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
उमेदवार आमदार राम सातपुते खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर, खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, माजी सहकारमंत्री आ. सुभाष देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार यशवंत माने, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार शहाजी पाटील, माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे, प्रशांत परिचारक, भाजपाचे ज्येष्ठ नेते किशोर देशपांडे, भाजपाचे लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदारसिंह केदार, लोकसभा निवडणूक प्रमुख शहाजी पवार आदी होते.
भाजपा आणि महायुतीने दीनदलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, अल्पसंख्यांक, महिला, ओबीसी अशा सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे. देशाचा विकास पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात. ही निवडणूक तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठीची निवडणूक आहे. २५ कोटी लोकांना गरीबीरेषेच्या बाहेर काढण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. २० कोटी लोकांना घरे, ५० कोटी शौचालये, ५५ कोटी उज्वला गॅस योजना, ६० कोटी नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी, ५५ कोटी लोकांना आयुष्यमान भारत योजना देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केले आहे. किसान सन्मान योजना, पीक विमा योजना, शेतमजुरांना संरक्षणही मोदी शासनाने दिले आहे.
सोलापुरातील काहीजण काँग्रेसला समर्थन देत आहेत. सोलापुरात तीस हजार घरे बांधण्यासाठी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच मदत केली आहे. त्यामुळे त्यांनी कोणालाही समर्थन दिले तरी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच समर्थन देणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत ३०० युनिट वीज मोफत देण्यात येणार आहे. याकरिता तब्बल एक कोटी नागरिकांनी नोंदणीही केली आहे. तसेच मुद्रा योजनेतून २० लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्जही देण्यात येणार आहे. भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी सोलापूरकरांनी यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करावेत आणि आमदार राम सातपुते आणि खासदार रणजीतसिंह नाईक – निंबाळकर यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राम सातपुते हा रडणारा नव्हे तर लढणारा आहे !
राम सातपुते हा रडणारा नव्हे तर लढणारा आहे. हे नेतृत्व गरीबी आणि संघर्षातून तयार झाले आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेले हे नेतृत्व नाही. गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी आमदार राम सातपुते मैदानात उतरले आहेत. विरोधकांकडे अमाप पैसा असेल परंतु चांगल्या कामाच्या माध्यमातून आमदार राम सातपुते यांनी जनतेचे प्रेम कमावले आहे, असा कौतुकाचा वर्षाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार राम सातपुते यांच्यावर केला.