सोलापूर/प्रतिनिधी
सोलापूर लोकसभेतील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी भगवान महावीर जयंती निमित्त रविवारी शहरातील बुबणे जैन मंदिरात जाऊन दर्शन घेतले. अहिंसा या तत्त्वावर जैन धर्माची उभारणी झालेली आहे. जैन धर्माने सर्वांना जगण्याचा अधिकार असल्याचा विचार समाजात रुजवला असल्याची भावना प्रणिती शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
भगवान महावीर हे जैन धर्माचे शेवटचे म्हणजेच २४ वे तीर्थंकर मानले जातात. चैत्र महिन्यातील शुक्लपक्षातील त्रयोदशी तिथीला भगवान महावीरांचा जन्म झाला असे मानले जाते. रविवार, २१ एप्रिल रोजी सोलापूरमध्ये जैन धर्मीय नागरिकांनी मोठ्या उत्साहात भगवान महावीर जयंती साजरी केली. यावेळी प्रणिती शिंदे यांनी बुबणे मंदिरात उपस्थिती लावत दर्शन घेतले. तसेच जैन धर्मीयांच्या वतीने काढण्यात आलेल्या रथ यात्रेत सहभागी होऊन सर्वांना जय जिनेद्र म्हणत महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पराग शाह, राजेंद्र कांसवा, पदम राका, बाहुबली भूमकर, मिलिंद म्हेत्रे, राहुल शाह, मनीष शाह, सुनील सोनिमिंडे जितेंद्र बलदोटा, नंदकुमार कंगले आदी मान्यवर उपस्थित होते.