सोलापूर/प्रतिनिधी
भाजप जनतेला मूळ मुदद्यापासून भरकटवत आहे. रेटून खोटे बोलणे ही भाजपची परंपरा आहे. त्यांच्याकडे निवडणुकीला मुद्दा नाही. त्यांनी मागील १० वर्षात काही केलेले नाही. त्यामुळे ते धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या सोलापुरची एकी बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केला.
‘मुद्दयाचे बोला ओ’ या मोहिमेअंतर्गत आज(रविवार २१एप्रिल २०२४) अशोक चौकमधील बोल्ली मंगल कार्यालयात विडी कामगारांच्या प्रश्नांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रणिती बोलत होत्या.
प्रणिती पुढे म्हणाल्या, सोलापूर शहराला ८ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पाण्याचे नियोजन नाही. युवकांना रोजगार मिळत नाहीये. महागाई प्रचंड वाढली आहे. याचा सर्वाधिक त्रास हा महिलांना होत आहे. असे अनेक गंभीर प्रश्न असताना भाजप धार्मिक जातीजातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही कामाचं बोला, तुम्ही विकासाच्या मुद्याचे बोला, असेही प्रणिती म्हणाल्या.
सोलापुरातील प्रश्नावरून ‘मुद्याचे बोला ओ’ हे अभियान राबवण्यात येत आहे. यात सोलापुरातील प्रश्नावरून चर्चा व्हावी, ते मुद्दे सोडवले जावे या मागचा या अभियानाचा उद्देश आहे. या अभियांनाअंतर्गत आज विडी कामगाराचे प्रश्न, जनतेचे प्रश्न यांची वाचा फोडण्यात आली. याप्रसंगी ‘मुद्याचे बोला ओ’ हे रॅप साँग प्रणिती यांच्याकडून लाँच करण्यात आले.
विडी कामगारांना आधी आठवड्याला रोख पगार मिळायचा. भाजप सरकारने नोटबंदी करून विडी कामगारांना जी रोख पगार मिळायची ती बंद केली. यात विडी कामगारांचे नुकसानं झाले. त्यांना वारंवार बँकेत पैसे काढण्यासाठी हेलपाटे मारावे लागतायेत. भाजपने नोट बंदीतून साध्य तरी काय केलं? त्यांना गरिब जनतेला, विडी कामगारांना त्रास द्यायचा होता का? असा सवाल सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी विचारला. याप्रसंगी सोलापूर शहरातील बिडी कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.