दोन दिवसात राजकीय निर्णय जाहीर करणार : हनुमंत मोरे
पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळत नसल्याची व्यक्त केली खंत
पंढरपूर /प्रतिनिधी
सोलापूर लोकसभेतील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्याकडून काँग्रेस पक्षाचा शिष्टाचार पाळला जात नाही, काँग्रेस पक्षात आपला स्वाभिमान दुखावला असल्याने खंत व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना हनुमंत मोरे म्हणाले की आपण मागील काही दिवसांपूर्वी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांकडे तालुकाध्यक्षपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मात्र अद्याप पर्यंत तो मंजूर करण्यात आला नसल्याचे सांगत लोकसभा निवडणुकीत अस्तित्व टिकवण्यासाठी दोन दिवसात आपला राजकीय निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती पंढरपूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी त्यांच्या समवेत ज्येष्ठ मार्गदर्शक अनिल बोराडे, आप्पा थिटे, नितीन व्यवहारे , दिलीप कोरके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मागील महिन्यात १५ मार्च २०२४ रोजी पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंत मोरे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यावेळी त्यांनी पक्षात होणारी घुसमट बोलून दाखवली होती. त्यावेळी तालुकाध्यक्ष पदाबरोबरच काँग्रेसच्या सदस्यत्वाचाही राजीनामा त्यांनी दिला होता.
हनुमंत मोरे हे गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षात कार्यरत आहेत. काँग्रेसमध्ये त्यांनी आजतागायत जिल्हा सहसचिव, जिल्हा सचिव, माढा तालुका निरीक्षक अशी अनेक पदे भूषवली आहेत. यावेळी त्यांनी आपल्या कामातून काँग्रेसमध्ये मोठे नाव केले होते. या कामाच्या जोरावरच त्यांची ३० डिसेंबर २०२२ रोजी, पंढरपूरच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाली होती. तालुकाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पक्षासाठी अनेक कार्यक्रम घेऊन धडाका उडवून दिला होता. परंतु लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, त्यांची वरिष्ठ नेते मंडळींकडून निराशा झाली. काँग्रेसचा तालुकाध्यक्ष म्हणजे मिनी आमदारच असतो. परंतु या पदाचा सन्मान वरिष्ठ नेते मंडळींनी राखला नाहीत. परिणामी हनुमंत मोरे हे नाराज झाले. त्यांनी १५ मार्च २०२४ रोजी आपला राजीनामा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांच्याकडे सादर केला होता.
समाजकार्यातून राजकारणाकडे आलेल्या हनुमंत मोरे यांना, महिन्याभरात अनेक नेते मंडळींकडून पाचारण करण्यात आले. परंतु त्यांनी कोणालाही शब्द दिला नाही. अखेर राजकारणाच्या प्रवाहात राहण्यासाठी, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून, पुढील दोन दिवसात आपला निर्णय जाहीर करणार आहोत, अशी प्रतिक्रिया हनुमंत मोरे यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत दिली.