सोलापूर / प्रतिनिधी
कर्नाटकच्या हुबळीतील सौंदत्ती येथील नेहा निरंजन हिरेमठ हिच्या हत्येच्या निषेधार्थ आज (सोमवार दि. २२ एप्रिल) सायंकाळी ६.३० वाजता ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरापासून समाजातील महिला मंडळाच्यावतीने कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे.
नेहा ही लिंगायत जंगम समाजातील सुसंस्कारी, शांत, हुशार मुलगी म्हणून ओळखली जात होती. एक विकृत मनोवृत्तीचा तरुण तिच्या वर्गात शिकत होता. तो सतत तिच्या मागावर असायचा, अश्लील हावभाव करून तिला सतत त्रास देत होता हे कृत्य तिने तिच्या घरच्यांना सुद्धा सांगितले होते. तिच्या घरच्यांनी ह्या नराधमाला अनेकदा ताकीद देवुन सुद्धा नेहाच्या मनाविरूद्ध हा नराधम वागत होता. नेहा त्याला भिक घालत नाही. याचा राग मनात ठेवून ह्या नराधमाने नेहाचा खुन करून बळी घेतला.
या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेचा निषेध करण्यासाठी वीरशैव व्हिजनच्यावतीने आज सायंकाळी ६.३० वाजता श्री सिद्धरामेश्वर मंदिर येथून कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे. त्याचा समारोप भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ होणार आहे.
या कॅन्डल मार्चमध्ये तमाम सोलापूरकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अक्कनबळग महिला मंडळ, महाराष्ट्र वीरशैव सभा महिला आघाडी, वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान महिला आघाडी, शंकरलिंग महिला मंडळ, दानेश्वरी महिला मंडळ, अक्कनबळग महिला मंडळ मड्डी वस्ती, बसव केंद्र, वीरशैव महिला बिजनेस ग्रुप, वीरशैव व्हिजन महिला आघाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.