सोलापूर / प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प सोलापूर जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाने केला. वीरशैव लिंगायत समाजाचा मेळावा लिंगशेट्टी मंगल कार्यालय येथे झाला.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल हत्तुरे, श्रावण जंगम, देवणीकर, महादेव न्हावकर, राहुल पावले, मंचाचे शहर संयोजक चिदानंद मुस्तारे होते.
मेळाव्याच्या प्रारंभी आद्य जगद्गुरू रेणुकाचार्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करत अभिवादन करण्यात आले. तसेच हुबळी येथील कॉलेजमध्ये भरदिवसा घडलेल्या नेहा हिरेमठ हिच्या नियोजित हत्याकांडाचा धिक्कार करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
देशहिताच्या तसेच राष्ट्रीय मुद्द्यांवर वीरशैव लिंगायत समाजाने आगामी सार्वत्रिक निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन हिंदू वीरशैव लिंगायत मंचाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे मार्गदर्शक उद्योजक अण्णाराय बिरादार यांनी केले. आगामी लोकशाहीच्या राष्ट्रीय उत्सवात सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय मुद्द्यावरून राष्ट्रीय मुद्याकडे नेत १०० टक्के मतदान घडवून एकूण मतदानाची टक्केवारी वाढण्याकरता शहर व जिल्ह्यात विविध स्तरावर बैठका घेऊन प्रबोधन व जनसंपर्क करण्याचे आवाहन श्री. बिरादार यांनी यावेळी केले.
शत प्रतिशत मतदान प्रत्यक्ष घडवून आणण्याकरिता विविध स्तरावर बैठका घेण्याची रचना प्रांत मिडिया संयोजक राहुल पावले यांनी उपस्थित समाज बांधवांच्या समोर मांडली. एक भारत श्रेष्ठ भारत, राष्ट्राचा प्रगतीसाठी, विश्वभरात भारतमातेचा गौरव तसेच सुरक्षित भारताकरीता १०० टक्के मतदान करण्यासाठी उपस्थितांना दानिश तिमशेट्टी यांनी प्रतिज्ञा दिली. यावेळी राष्ट्रीय जंगम समाजाचे युवक अध्यक्ष श्रावण जंगम यांनी या संकल्पास पाठींबा देत सक्रियपणे कार्य करण्याचे आश्वासन दिले. या मेळाव्यात वीरशैव महासभेच्या महिला प्रमुख पुष्पाताई गुंगे यांनीही मनोगत व्यक्त केले. महादेव न्हावकर यांनी प्रास्ताविक तर हिंदु वीरशैव लिंगायत मंचाचे शहर संयोजक चिदानंद मुस्तारे यांनी सूत्रसंचालन केले.
या मेळाव्यास समाजातील राजश्री देसाई, शोभा नष्टे, विद्या जोडभावी, मीना थोबडे, निर्मला किणगी, रंजिता चाकोते, बसवराज इटकळे, जगदीश पाटील, सचिन कुलकर्णी, सागर अतनुरे, चन्नवीर चिट्टे, मल्लेश कावळे, सिद्धरामय्या स्वामी, सुनील रिक्के, सचिन विभूते, रवींद्र बसवंती, अशोक स्वामी, अनिल बिराजदार, केदार भोगडे, गुरुराज चरंतीमठ, हृषीकेश कुलकर्णी, मुकुंद कुलकर्णी आदी समाजबांधव उपस्थित होते.