करकंब येथे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ सभा संपन्न
पंढरपूर /प्रतिनिधी
अभिजित पाटलांच्या एकप्रकारे मुसक्या बांधून पक्षात घेण्याचा घाट घातला असून पाटील न इलाजाने तिकडे जात आहे. परंतु पंढरपुरी जनतेच्या त्यांना हिसक्का माहीत नसून सत्ताधारी कायम आपल्या हातात सत्ता राहणार असल्याच्या अविर्भावात वागत असून अधिकारी त्यांचे ऐकून चुकीची कामे करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे माढा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत जयंत पाटील बोलत होते.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,शिवतेजसिंह मोहिते पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, एडवोकेट दीपक पवार,संजय पाटील घाटणेकर,शरदचंद्र पांढरे, प्रा सतीश देशमुख,बाळासाहेब धाईजे,अरुण तोडकर,सुभाष गुळमे,नंदू कारंडे, विजय भिंगारे, सदाशिव शेळके, महादेव तळेकर, दीपक वाडदेकर, नितीन बागल, संघटनेचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
नियोजनाचा अभाव आणि काही लोकांच्या हट्टामुळे हातात असलेले उजनीचे पाणी जास्त दिवस सोडून पाण्याचे संकट निर्माण केले. शिवाय ज्या अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांचे ऐकून चुकीची सही केली अशा अधिकाऱ्यांनी राज्यात फिरून यावे म्हणजे त्यांना कळेल हे सरकार दोन महिने सुद्धा राहणार नाही. त्यावेळी चुकीच्या सह्या करणाऱ्या अधिकाऱ्यांची अडचण वाढेल. मोदी सरकारच्या नाकर्तेपन घराघरात पोहचले आहे. या सत्ताधाऱ्यांनी राज्यातील जेवढे भ्रष्टाचारी आहेत. त्यांना भाजपने पक्षात घेऊन भ्रष्टाचार्यांची मांदयाळी केली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनतेच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. अशात सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएमचा घोटाळा केला तर लोकं रस्त्यावर उतरतील असा इशारा जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.