मागील निवडणुकीत लायकी नसणाऱ्या उमेदवाराला निवडून दिले; संभाजी शिंदे यांचा निंबाळकरांवर निशाणा
करकंब येथे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ सभा संपन्न
पंढरपूर /प्रतिनिधी
माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ रविवारी पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे म्हणाले की मागील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची शिवसेनेशी युती असल्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात लायकी नसणारा उमेदवार निवडून आला होता. अशा शब्दात संभाजी शिंदे यांनी निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला. पुढे बोलताना शिंदे म्हणाले की राज्यात भाजपाने केलेल्या पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामुळे जनता नाराज आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक भाजपा विरोधात पेटून उठला आहे. यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील, संजय पाटील घाटणेकर, जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, दीपक पवार, शरदचंद्र पांढरे, प्राध्यापक सतीश देशमुख, दीपक वाडदेकर, महादेव तळेकर यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.