सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
सोलापूर / प्रतिनिधी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभा उद्या बुधवारी १ मे रोजी दुपारी १.३० वाजता वालचंद शिक्षण महाविद्यालयाजवळील वल्याळ मैदानावर होणार आहे. सोलापूर लोकसभेचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सभेची वेळ दुपारी १.३० ची असल्यामुळे नागरिकांना उन्हापासून बचावासाठी वल्याळ मैदानावर भव्य मंडप उभारण्यात येत असून मंडपाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा सोलापूरात आयोजित करावी, अशी भाजपा कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची मागणी होती. त्यामुळे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदुत्वाची धडाडणारी तोफ म्हणून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ओळखले जाते. तरुण वर्गामध्ये त्यांची मोठी लोकप्रियता आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतील मित्र पक्षांकडून योगी आदित्यनाथ यांच्या सभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे. या सभेसाठी सोलापूरकरांची मोठी गर्दी होणार हे लक्षात घेऊन सभेसाठी आसन व्यवस्था तयार करण्यात येत आहे. योगी आदित्यनाथ यांच्या सभेसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी आणि महायुतीकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते व भाजपाचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी मंगळवारी सभेच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी राम सातपुते म्हणाले, योगी आदित्यनाथ यांचे विचार ऐकण्याकरिता त्यांची सोलापूरात सभा व्हावी, असा आग्रह भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून आणि नागरिकांकडून करण्यात येत होता. त्यामुळे ही सभा आयोजित करण्यात आली आहे. सोलापूरकरांनी प्रचंड मोठ्या संख्येने या सभेस उपस्थित रहावे, असे आवाहनही आमदार राम सातपुते यांनी याप्रसंगी केले.