माढ्यात रंगत वाढली…..
पंढरपूर/प्रतिनिधी
श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये सक्रिय असणारे अभिजीत पाटील यांनी विठ्ठल कारखान्यावर घडलेल्या घडामोडीनंतर भाजपाच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कारखान्यावर येण्याचे निमंत्रण दिले होते. रविवारी निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर विजय संकल्प मेळावा घेण्यात आला.
यावेळी अभिजीत पाटील यांनी नाव न घेता भगीरथ भालके यांच्यावर आरोप प्रत्यारोप केले होते. अभिजीत पाटील यांच्या पाठिंब्यानंतर भाजपाच्या उमेदवाराला मोठे पाठबळ मिळाल्याची चर्चा होत असताना सर्वच नेते महायुतीच्या बाजूने गेल्याने पंढरपूर तालुक्यातील 42 गावात एकाकी पडलेल्या मोहिते-पाटील यांच्या पाठीशी विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके हे धावून आल्याने माढ्यात रंगत वाढली आहे.
भगीरथ भालके यांनी धैर्यशील मोहिते-पाटील यांना पाठिंबा दिल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊ लागल्या आहेत.