मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांची आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्याकडे मागणी
पंढरपूर /प्रतिनिधी
तीर्थक्षेत्र पंढरपूर शहरात १०० खाटांचे स्वतंत्र महिलांचे रुग्णालय मंजूर करावे. या मागणीसाठी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन निवेदन दिले. या मागणीची दखल घेत आरोग्यमंत्र्यांनी तात्काळ संबंधित विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
पंढरपूर शहराची लोकसंख्या जवळजवळ दोन लाखाच्या आसपास असून पंढरपूर शहरात रोज किमान एक लाख भाविक संपूर्ण देशातून येत असतात. यामध्ये पुरुष भाविका बरोबर महिला भाविकांचे प्रमाण मोठे आहे.
पंढरपूर शहरात एक उपजिल्हा रुग्णालय असून या रुग्णालयात ग्रामीण भागातून आणि शहरी भागातून रोज शेकडो रुग्ण येत असतात.
त्यामुळे या उपजिल्हा रुग्णालयावर मोठ्या प्रमाणात ताण पडत असल्याने अनेक रुग्णाची गैरसोय होत आहे. पंढरपूर शहरात स्वतंत्र महिला रुग्णालय नसल्याने पंढरपूर शहरातील गोरगरीब महिला आणि महिला भाविक जर आजारी पडल्या तर त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जावे लागत आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी खाजगी डॉक्टर्स हजारो रुपयांची बिले करत आहेत आणि हे हजारो रुपये गोरगरीब महिला माता-भगिनींना परवडणारे नाही. ही बाब लक्षात घेऊन पंढरपूर शहरात १०० खाटांचे स्वतंत्र महिला रुग्णालय मंजूर करावे आणि त्याचे काम सुरु करण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावेत. अशी मागणी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी केली आहे.