प्रशासनाने दखल घेत मार्ग काढण्याचे दिले आश्वासन
पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना व्यापारी हातगाडी धारकांना अतिक्रमणच्या नावाखाली नाहक त्रास थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा युवक नेते भगीरथ भालके यांनी प्रशासनाला दिला आहे. याबाबतचे निवेदन पंढरपूर उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर यांना देण्यात आले आहे.
यावेळी माजी नगरसेवक सुधीर धोत्रे, राहुल साबळे, संजय बंदपट्टे, शिवाजी मस्के, मुन्ना मलपे, दत्ता भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
पंढरपूर शहरामध्ये भरणाऱ्या यात्रेवर अनेक नागरिकांच्या उदरनिर्वाह चालत आहे.
मात्र आषाढी यात्रेच्या निमीत्ताने छोटे,मोठे व्यापारी, सर्वसामान्य स्थानिक व्यापाऱ्यांवर अतिक्रमणाच्या नावाखाली हटवण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे. पंढरपूर शहरातील शिवतीर्थ व आसपास असणाऱ्या हातगाडे व्यापाऱ्यांना दि. १० ते २२ जुलै २०२४ या तारखेपर्यंत सुमारे बारा दिवस व्यवसाय बंद करून जागा मोकळी करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. याबाबत पंढरपूरातील सर्वसामान्य नागरिक दोन दिवसासाठी स्वखुशीने जागा रिकामी करुन देण्यास तयार आहेत. तसेच टाकळी रोड परीसरातील टपरीधारकांना व खोकीधारक मुख्यमंत्री चहापाण्यासाठी जाणार आहेत. त्या मार्गावरील टपऱ्या हटवण्याबाबत नोटीस देण्यात आले आहेत. तुमच्या चहा पाण्याच्या कार्यक्रमासाठी आमच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत करु नका अशी मागणी करण्यात आली आहे तसेच स्वातंत्र्यविर सावरकर यांच्या पुर्णकृती पुतळ्यांच्या पाठीमागील बाजुस असणाऱ्या गाळेधारकांना विकासाच्या नावाखाली अडथळा निर्माण करुन त्यावरती अन्याय करत आहात ते काम तात्काळ बंद करण्यात यावे.
अन्यथा येत्या काळामध्ये आम्ही रस्त्यावरती उतरुन चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा युवक नेते भगीरथ भालके यांनी दिला आहे.
भगीरथ भालके यांच्या इशाऱ्याची दखल घेत शिवतीर्थ परिसरातील टपरीधारकांना देण्यात आलेली मुदत कमी करून प्रशासनाने मार्ग काढण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती भगीरथ भालके यांनी दिली.