पंढरपूर /प्रतिनिधी
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, त्यामध्ये श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम 15 मार्चपासून सुरू करण्यात आले आहे. सदरच्या कामांची पाहणी विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी केली.
यावेळी मंदिर समितीचे सह.अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, अक्षय महाराज भोसले उपस्थित होते.
यावेळी बोलताना त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी आपण चार वर्षे पाठपुरावा केला होता. त्यानुसार आता पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर काम सुरू असल्याबाबत समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे श्री विठ्ठल व रुक्मिणी च्या मूर्तीला कोणतीही हानी न पोहोचता हे काम झाले आहे. सदर कामांमध्ये मंदिराचे झरोके, काही खिडक्या मोकळ्या केल्यामुळे मोठा फरक पडला आहे. सदर काम पाहता श्रद्धा व व्हिजन याचा सुरेख संगम झाल्याचे पहावयास मिळत आहे. तसेच शहरातील प्रदक्षिणामार्ग, भक्ती मार्ग, मंदिराचा दर्शन मंडप, संत विद्यापीठ आदींची काम देखील करण्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे उपसभापती डॉ. गोरे यांनी सांगितले.
आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना आवश्यक व मुबलक सोयी-सुविधा मंदिर समितीच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामध्ये दर्शनरांगेत बॅरीकेटींग करून त्यावर ताडपत्री शेड, जादा पत्राशेडची निर्मिती, आपत्कालिन गेट, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, बसण्याची सुविधा, लाईव्ह दर्शन, कुलर-फॅन, मिनरल वॉटर, चहा वाटप करण्यात येत असल्याची माहिती सह अध्यक्ष .गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी योवेळी दिली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या हस्ते शुभारंभ
पंढरपूर, दिनांक 15- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ संत मुक्ताबाई मठ येथे विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याहस्ते करण्यात आला. राज्यातील महिलांनी याचा लाभ घ्यावा यासाठी रविवार दिनांक 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमेपासून याचे राज्यभरात अभियान राबविले जाणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली
या कार्यक्रमास अक्षय महाराज भोसले, स्वामी महामंडलेश्वर जनार्दन हरि महाराज, मुक्ताई पालखी सोहळयाचे अध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे, विश्वस्त पंजाब दादा पाटील,सम्राट पाटील, ज्योती वाघमारे यांच्यसह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ 21 ते 65 वयोगटातील प्रत्येक महिलेला मिळाला पाहिजे यासाठी सर्व शासकीय यंत्रणेने प्रयत्न करावेत. शासन ही या योजनेची मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसिद्धी करत असून ग्राम स्तरावरील प्रत्येक पात्र महिलेपर्यंत ही योजना पोहोचावी, असे डॉक्टर गोऱ्हे यांनी सांगितले.
यावेळी एसटीच्या जादा गाड्या, वारकऱ्यांच्या वाहनांसाठी पथकर माफी तसेच महिलांना 50 टक्के व 75 टक्के वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास एस.टी अशा सुविधा उपलब्ध असून, या सुविधांसह वारकऱ्यांचा विमा देखील काढला असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.