राज्य सरकारच्या निर्णया विरोधात फुले,शाहू,आंबेडकर विचार मंचाने घेतली हरकत
पंढरपूर /प्रतिनिधी
शासन निर्णयानुसार सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना व वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी अनुसूचित जातीसाठी खर्च करण्यासाठी असतो. त्या निधीतून मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना व वारकरी महामंडळ स्थापन करणे चुकीचे असल्याचे मत फुले,शाहू, आंबेडकर विचार मंचाने व्यक्त करत हरकतीचे निवेदन राज्य सरकारला पाठवण्यासाठी पंढरपूर तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
यावेळी फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष सुनील वाघमारे, उपाध्यक्ष ऍडव्होकेट कीर्तीपाल सर्वगोड, भालचंद्र कांबळे, एल. एस सोनकांबळे, दशरथ दोडके, श्रीकांत कसबे, सेवागिरी गोसावी, उमेश पवार, राजेंद्र पराधे, देविदास कसबे, गौतम साबळे, गुरु दोडिया, नानासाहेब लोखंडे, हनुमंत बंगाळे, सुनील दंदाडे, बापू डावरे यांच्यासह विचार मंचाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्यासाठी विशेष निधीची तरतूद करणे गरजेचे आहे. त्यामार्फत मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना राबविण्यात यावी. असे असताना अनुसूचित जातीचा निधी या यासाठी वापरणे म्हणजे अनुसूचित जातीवर अन्याय आहे.
ज्या कारणासाठी हा निधी असतो, त्याबर तो खर्च केला जात नाही. राज्यात अनुसूचित जातीसाठी असलेल्या निधीतून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर दिली जात नाही.पीएचडी संशोधकांना फेलोशिप वेळेत दिली जात नाही. रमाई घरकुल, अत्याचारग्रस्त पीडित, आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना वेळेवर अनुदान दिले जात नाही. त्यामुळे १४ जुलै २०२४ चा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीने फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीने राज्य सरकारकडे पाठवण्यासाठी पंढरपूर तहसीलदार यांना देण्यात आले आहे.