पंढरपूर/प्रतिनिधी
अनेक वर्षांपासून दुष्काळी तालुका असा शिक्का असणाऱ्या आपल्या मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरूपी संपुष्टात यावा यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून ऐतिहासिक निधी आणून अनेक वर्षांची २४ गावे उपसा सिंचन हा पाणीप्रश्न मार्गी लावण्यात आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि दिलेल्या संधीमुळे यश प्राप्त झाले असे उद्गगार पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले आहेत. निवडणूक प्रचारार्थ आ आवताडे यांनी भाजपा व महायुती पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांच्यासमवेत चौथ्या दिवशी मंगळवेढा तालुक्यातील बालाजीनगर, कात्राळ, कर्जाळ, कागष्ट, डिकसळ, माळेवाडी, पौट, येळगी, हुलजंती या गावांमध्ये प्रचार दौरा करुन गावाकऱ्यांशी संवाद साधला.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मला अतिशय कमी कालावधी मिळाला असला तरी जनतेप्रती माझी असणारी सेवाभावी नैतिकता आणि तळमळ यांच्या जोरावर मी आपल्या मतदारसंघातील अनेक प्रश्नांना हात घालून विकासाच्या रूपाने मार्गी त्यांना पूर्ण केले आहे. विकास निधीचा हिशोब मागणाऱ्यांनी कितीही खटाटेप आणि गैरसमज निर्माण केला तरी मी त्यांच्या टिकेला गांभीर्याने न घेता तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर असेन, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सामान्य जनतेच्या हिताचा विचार करुन देश चालवत आहे. अगदी त्याच पद्धतीने राज्यातील देखील येणारे सरकार हे महायुतीचे असल्यामुळे सामान्य जनतेचे सेवाचक्र आणखी गतिमान होणार आहे. राज्यातील महिला भगिनींच्या अर्थिक सक्षमीकरणासाठी चालू असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नसल्याचे त्यांनी यावेळी विरोधकांना ठणकावून सांगितले. रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, पाणी इत्यादी विकास कामांसाठी हजारो कोटींचा निधी आणला असला तरी मला आपल्या आशीर्वादाने मिळणाऱ्या या संधीचे सोने करुन याहीपेक्षा मोठ्या विकास कामांना मंजुरी आणून आपल्या मतदारसंघाला रोल मॉडेल बनवायचे आहे असे त्यांनी म्हटले आहे.
महायुती सरकारने महाराष्ट्राला विकासपथावर अग्रेसर ठेवले आहे. विकासाची हीच गंगा मतदारसंघात अखंडपणे राहावी यासाठी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीला आशीर्वाद देण्याची विनंती उमेदवार समाधान आवताडे यांनी उपस्थितांना केली. सदरवेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर, जेष्ठ नेते दत्तात्रय जमदाडे, भाजपा विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सुरवसे, जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, संचालक तानाजी काकडे, माजी संचालक विजय माने, पप्पू काकेकर, यांचेसह संबंधित गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत आजी-माजी सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.