पंढरपूर /प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील नागरिकांनी ईव्हीएमला विरोध करून मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती. ही मागणी फेटाळल्यानंतर या गावातून ईव्हीएम विरोधात ठिणगी पेटली होती. ईव्हीएमच्या विरोधात आणि समर्थनार्थ नेत्यांच्या सभा होत असल्याने मारकडवाडी हे गाव चांगलेच चर्चेत आले असताना दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातीलच पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीने राज्यातील पहिला ईव्हीएम समर्थणार्थ मतदानाबाबत ठराव बहुमताने पारित करून ईव्हीएम द्वारे मतदान घेण्याला समर्थन देऊन लक्ष वेधले आहेत.
गुरुवारी पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीची मासिक सभा सरपंच संजय साठे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये ईव्हीएमच्या समर्थनार्थ मतदानाबाबतचा ठराव ग्रामपंचायत सदस्यांसमोर मांडण्यात आला होता.
या ठरावाला १७ सदस्यांपैकी १३ सदस्यांनी उपस्थित राहून ईव्हीएमच्या समर्थनार्थ मतदानाबाबत मांडलेल्या ठरावाला हात उंचावून सहमती दर्शवल्याने बहुमताने ठराव संमत करण्यात आला असल्याची माहिती ग्रामसेवक खंडागळे यांनी दिली.
याबाबत सरपंच संजय साठे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की ईव्हीएमने मतदान घेतले जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आपल्या मतदानाचा हक्क बजावत येत आहे. मात्र काही लोक ईव्हीएमला विरोध करत आहेत. मागील काळात मतपत्रिकेवर मतदान होत असताना काही ठिकाणी मत पेट्या गायब करणे, मतदान केंद्राचा ताबा घेऊन सर्वसामान्य मतदारांचा हक्क हिरावून घेण्याच्या घटना घडत होत्या. मात्र सध्या ईव्हीएमद्वारे मतदान होत असल्याने नागरिकांना निर्भयपणे मतदान करता येत आहे. ईव्हीएममध्ये कोणतीही गडबड होत नाही. असा विश्वास व्यक्त करत त्यांनी पुढील काळातही ईव्हीएमद्वारे मतदान प्रक्रिया राबविण्यात यावी. यासाठी हा ईव्हीएम समर्थणार्थ मतदानाबाबत ठराव करण्यात आला असल्याचे सांगितले.
यावेळी त्यांनी जिल्ह्यात महाविकास आघाडीचे अनेक आमदार निवडून आले या ठिकाणी गडबड झाली नाही का? असावा उपस्थित करत ईव्हीएमला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेतला.