पंढरपुरात राज्यातील धनगर समाज शेळ्या-मेंढ्या घेऊन आषाढी एकादशीला घालणार प्रदक्षिणा; राज्यातील धनगर समाज बांधवांना नेत्यांचे आवाहन
पंढरपूर/प्रतिनिधी
सकल धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने
ऐन आषाढी एकादशी दिवशी राज्यातील धनगर समाज बांधव आपल्या शेळ्या-मेंढ्या सहीत आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालून व्ही.आय.पी. गेट समोर आंदोलन करून मुख्यमंत्र्यांना महापुजेपासून रोखणार असल्याचा इशारा सकल धनगर समाजाने पंढरपुरात दिला आहे.
याबाबतचे निवेदन धनगर समाज बांधवांनी मंगळवारी पंढरपूर तहसील कार्यालयाला दिले आहे.
आंदोलनासाठी आषाढी एकादशी दिवशी राज्यातील समाज बांधवांनी शेळ्या-मेंढ्या घेऊन पंढरपुरात येण्याचे आवाहन धनगर समाजातील नेत्यांनी केले आहे.
याची गंभीर दखल घेवून तात्काळ मागण्या मान्य कराव्यात.
अन्यथा आषाढी एकादशीला होणाऱ्या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा सकल धनगर समाजाने दिला आहे.
यावेळी माऊली हळनवर, प्रा. सुभाष मस्के, हरिभाऊ गावंधरे, सोमनाथ ढोणे, प्रशांत घोडके, पंकज देवकते, भजनदास गावडे, प्रसाद कोळेकर, संजय लवटे यांच्यासह पंढरपूर शहर व तालुक्यातील सकल धनगर समाज बांधव उपस्थित होते.
पंढरपूर येथे सोलापूर जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील धनगर समाजातील विविध संघटना व पदाधिकाऱ्यांची धनगर समाजातील प्रलंबित मागण्यासाठी बैठक झाली होती. या वेळी शासनाकडे धनगर समाजाच्या विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले होते. परंतू शासनाने समाजाच्या कुठल्याही मागणीकडे लक्ष दिले नाही. जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारची बैठक घेण्याची तसदी घेतली नसल्याचा आरोप करत सकल धनगर समाज आक्रमक झाला असून
आषाढी एकादशी दिवशी पहाटे दोन वाजता आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
बैठकीमध्ये केलेल्या मागणी नुसार धनगर समाजासह एन.टी. प्रवर्गातील सर्व घटकांना कै.आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवर अंमलबजावणी व्हावी. ३० लक्ष रूपयांचे कर्ज बिन व्याजी मिळावे. पंढरपूर शहरात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे सुशोभिकरण करण्यात यावे. पंढरपूर सह संपूर्ण भारत देशामध्ये अहिल्यादेवी होळकरांनी तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांच्या निवाऱ्याची सोय व्हावी म्हणून अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या आहेत.पंढरपूर शहरामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने अहिल्या भवन साठी जागा उपलब्ध करून भरघोस निधी देवून वरील समाजाच्या मागण्या त्वरीत मान्य कराव्यात. अन्यथा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला शेळ्या मेंढ्या घेऊन प्रदक्षणा घालून व्ही. आय. पी. गेट समोर आंदोलन करणार आहोत. असा इशारा धनगर समाजाने प्रशासनाला दिला आहे.