माढा आणि सोलापुरात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा निर्धार
पंढरपुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
पंढरपूर/प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची पंढरपूर येथील हॉटेल विठ्ठल इन येथे बैठक सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
यावेळी संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी त्यांनी आघाडीच्या नेत्यांबरोबर पुढील राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली असून पुढील काळात एकजुटीने निवडणुकीशी सामोरे जाण्याचा निर्णय झाला असून राज्यात आघाडीच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर सर्व शिवसैनिक आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागले असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की देशात लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून जनतेवर लोकशाही टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. यावेळी त्यांनी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर संकष्टी चतुर्थी दिवशी नागरिकांसाठी मटणाची पार्टी करून भावनेशी खेळण्याचा आरोप करत सांगोल्याचे गद्दार आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात शिवसैनिक मैदानात उतरणार असल्याचा पाटील यांना इशारा दिला.
माढ्यात तुतारी आणि सोलापुरात आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते जोमाने कार्य करतील आणि कमळ उपटून काढतील असा विश्वास कोकिळे यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना उपनेते शरद कोळी, शिवसेना उपनेते अस्मिताताई गायकवाड, शिवसेना प्रवक्ते लक्ष्मण हाके, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख पूनमताई अभंगराव, आशाताई टोणपे, जिल्हा युवा अधिकारी गणेश इंगळे, जिल्हा युवा अधिकारी सचिन बागल, जिल्हा संघटिका वैद्यकीय राजश्री क्षीरसागर, जिल्हा संघटक वैद्यकीय शिवाजी जाधव यांच्या उपस्थितीत सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक पार पडली.