भारत कृषी महोत्सवात अखेरच्या दिवशी अरविंद पाटील यांनी केले दुग्ध व्यवसायिकांना मार्गदर्शन.
पंढरपूर/प्रतिनिधी
लोकनेते स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त भारत कृषी महोत्सवाचे आयोजन पंढरपूर येथील रेल्वे मैदानावर करण्यात आले आहे. सोमवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२ वा.
महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी पशुपालन व दुग्ध व्यवसाय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये वाय.टी पाटील डेअरी फार्मचे पशुधन सल्लागार अरविंद यशवंत पाटील यांनी
दुग्ध व्यवसाय तरुणांना एक नवी दिशा या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी मोठ्या संख्येने युवक दुग्ध व्यवसायिक, शेतकरी उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील नानीबाई चिखली येथील अरविंद पाटील यांनी बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर पुढे दूध व्यवसाय सुरू केला.
सुरुवातीला पहिल्या वेताच्या पाच गाई आणल्या. त्यानंतर पैदास वाढवत जनावरांची संख्या सव्वाशे पर्यंत कशी नेली. सध्या त्यांच्याकडे गाई, कालवड, पंढरपुरी म्हैस, होलस्टिन फ्रीजियन एचएफ जातीच्या गाई, जातिवंत वळू, यासह अनेक जनावरे आहेत. या व्यवसायातून कशाप्रकारे ते यशस्वी झाले याची सविस्तर माहिती दिली.
यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना गोठ्याची आदर्श उभारणी कशी करावी. विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी जनावरांच्या पायाखाली रबरि मॅट टाकावे, उन्हाळ्यात चाळीस अंशापर्यंत तापमान गेले तर तापमान नियंत्रणासाठी फॅगर सिस्टीम यंत्रणा कार्यान्वित करावी. दूध काढणीसाठी मिल्किंग मशीनचा वापर करावा, दिवसाचे दूध संकलन कसे करावे, मजूर खर्च वाचवण्यासाठी कमी खर्चात कापणी यंत्राचा वापर करावा, वर्षभर पुरेल इतका चारा तयार करून गरजेनुसार वापर कसा करावा, जनावरांनी योग्य प्रमाणात पाणी प्यावे या उद्देशाने नियोजन कसे करावे, कृत्रिम रेतन, वेळीच लसीकरण कसे करावे, पशुखाद्य, व्यवस्थापन, औषधे, जनावरांच्या नोंदी, माजाचा काळ याविषयी सविस्तर माहिती दिली.