सकल मराठा समाजातील नेत्यांनी दिली पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत माहीती
पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर येथे उभारण्यात येणाऱ्या राज्यातील पहिल्या राजश्री शाहू मराठा भवनचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशी दिवशी होणार आहे. यावेळी पंढरपूर शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे जल्लोष स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती पंढरपूर येथील मराठा समाज बांधवांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी किरणआप्पा भोसले, नागेश भोसले, महेश साठे, दीपक वाडदेकर, संतोष कवडे, दत्ता काळे, शनि घुले, तात्या जगताप यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते.
मागील कार्तिकी वारी दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पंढरपूर येथील सकल मराठा बांधवांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते.
यामध्ये विविध मागण्यांसह पंढरपुरात अद्यावत मराठा भवन बांधण्याची मागणी मान्य करण्यात आली होती. यासाठी वारंवार शिवसेनेचे महेश साठे यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केल्याने काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी यांनी पाच कोटी रुपये मंजूर केले होते. या भवनचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व्हावे यासाठी पंढरपुरातील मराठा समाजाच्या शिष्ट मंडळांने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निमंत्रण दिले होते. पंढरपुरातील मध्यवर्ती ठिकाणी नव्याने उभारण्यात येणाऱ्या राज्यातील पहिल्या राजश्री शाहू मराठा भवनचे भूमिपूजन मुख्यमंत्री आषाढी एकादशी दिवशी होणार आहे.
नव्याने उभारण्यात येणार्या मराठा भवनची तीन मजली अद्यावत इमारती असणार आहे. यामध्ये पहिल्या मजल्यावर सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका केंद्र, ग्राउंड लेवला शॉपिंग सेंटर आणि तिसऱ्या मजल्यावर बाहेरून येणाऱ्या प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, मराठा समाज बांधव यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती दीपक वाडदेकर यांनी दिली.