तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या विरोधात बोगस अपंग सर्टिफिकेट मिळवल्याचा आरोप करून बदनामी केल्याचा आरोप
पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दादा चव्हाण यांच्यावर दिव्यांग अधिनियम २०१६ अंतर्गत त्यांच्यावर अपंगत्वावर अपमानकारक टिप्पणी केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
दादा चव्हाण याने वैयक्तिक द्वेशापोटी तहसीलदार सचिन लंगुटे यांचे विरुद्ध बोगस अपंग सर्टिफिकेट मिळवल्याचा आरोप करून त्यांची बदनामी केल्याने दादा चव्हाण यांच्यावर मागील गुन्ह्याची पार्श्वभूमी तपासून मोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी सकल धनगर समाज व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन उपविभागीय दंडाधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी माऊली हळनवर, प्रा.सुभाष मस्के, आरपीआय राज्य उपाध्यक्ष आप्पासाहेब जाधव, आरपीआय प्रदेश संघटन सचिव युवक आघाडी दीपक चंदनशिवे, प्रशांत घोडके, सोमनाथ ढोणे, प्रसाद कोळेकर, अण्णा सलगर, संजय लवटे उपस्थित होते.
या देण्यात आलेल्या निवेदनामध्ये सचिन लंगुटे यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये आत्तापर्यंत विक्रीकर निरीक्षक, सहाय्यक गटविकास अधिकारी व तहसीलदार अशा पदावर दिव्यांग कोट्यातून नियुक्त मिळाल्या आहेत. नियुक्ती मिळाल्यानंतर त्यांनी दोन वेळा ससून हॉस्पिटल पुणे, एक वेळा सांगली,मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे मेडिकल बोर्ड समोर वैद्यकीय तपासण्या दिल्या आहेत. तसेच एक वेळ सर जे.जे शासकीय रुग्णालय मुंबई येथेही वैद्यकीय तपासणीवर अपंग सर्टिफिकेट फेर तपासणी केली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. असे असताना दादा चव्हाण या व्यक्तीने वैयक्तिक द्वेषापोटी तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या विरुद्ध बोगस अपंग सर्टिफिकेट मिळवण्याचा आरोप करून त्यांची बदनामी केली आहे. असा आरोप करण्यात आला आहे. तसेच पंढरपूर तालुक्यामध्ये कोणतेही शासकीय रस्त्याची कामे चालू झाली की कंत्राटदारांविरोधात खोट्या तक्रारी देणे व पंढरपूर तालुक्यातील खडी क्रेशर मालकांवर खोट्या तक्रारी करून दबाव आणला असल्याचा आरोप दादा चव्हाण यांच्यावर करण्यात आला आहे. याचा तपास पोलीस विभागामार्फत करावा तसेच त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्याचा तपास पोलीस विभागामार्फत तात्काळ पूर्ण करून न्यायालयात ठोस पुरावे सादर करून त्याच्यावर मागील काळात दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्याचा विचार करता त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी पंढरपूर येथील सकल धनगर समाज व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने उपविभागीय प्रांताधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर यांच्याकडे करण्यात आली आहे.