पंढरपूर/प्रतिनिधी
माढा लोकसभा मतदार संघासाठी भारतीय जवान किसन पार्टीने भारतीय वायु सेना निवृत्त अधिकारी गोपाळ यशवंत चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे.
याबाबत पंढरपुर येथील पत्रकार परिषदेत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी गोपाळ जाधव यांच्या नावाची माढा लोकसभा मतदार संघाचा उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा केली.
यावेळी बोलताना रघुनाथ पाटील म्हणाले की सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे.
जे पक्ष काँग्रेस,भाजपाकडे जाणार नाहीत अशा पक्षांना सोबत घेऊन आगामी निवडणुका लढवणार असल्याचे सांगितले.
यासाठी नारायण अंकुशे यांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्व माजी सैनिकांना एकत्र करून भारतीय जवान किसान पार्टीची स्थापना केली आहे.
यामध्ये बीआरएस पार्टी,शेतकरी संघटनेचा समावेश असल्याचे सांगितले.
सर्वांच्या वतीने माढा लोकसभेसाठी उमेदवार म्हणून गोपाळ जाधव यांना उमेदवारी जाहीर केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना भारतीय किसान जवान पार्टीचे माढा लोकसभेचे उमेदवार गोपाळ जाधव म्हणाले की सध्याची राजकीय,सामाजिक, शैक्षणिक परिस्थिती पाहता शेतकरी आणि जवानांसाठी काहीतरी करण्याची गरज आहे.
सीमेवर लढणारा जवान आणि शेतात काम करणारा किसान यांच्या समस्यांबरोबरच सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणीही पुढे येत नाही त्यांचे प्रश्न जसेच्या तसे आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जवान किसान पार्टी देशभरातील लोकसभेच्या ५४३ जागा आणि महाराष्ट्रातील २८८ विधानसभेच्या जागा लढवणार असून यासाठी आम्हाला समविचारी लोकांचा पाठिंबा मिळत असल्याचे जाधव यांनी सांगितले.