पंढरपूर /प्रतिनिधी
राज्यात भारतीय जनता पार्टी कडून पक्ष फोडण्याचे काम झाले आहे. सरकारमध्ये दुसऱ्या पक्षाचे ताकदवान नेते सामील होत आहेत. मात्र या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत.
यामुळे राज्यातील जनता भाजपा विरोधात नाराज आहे. राज्यात शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे यांच्या बाबत सहानुभूतीची लाट आहे.
माढा लोकसभा मतदार संघात आश्वासना व्यतिरिक्त कोणतीही विकास कामे न केल्याने भाजपाचे विद्यमान खासदार यांच्या दौऱ्यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर गाजर टाकून निषेध केला आहे.
सर्व आमदार तिकडे गेले असले तरी जनता आमच्या पाठीशी आहे.भाजपाकडून कोणीही उमेदवार असला तरी माढ्याचा खासदार हा शरदचंद्र पवार यांच्या विचारधारेचा होणार असल्याचा विश्वास अभयसिंह जगताप यांनी व्यक्त केला. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी प्रदेश युवक शरदचंद्र पवार गटाचे अभयसिंह जगताप आले असता पत्रकारांशी संवाद साधला
यावेळी त्यांनी देशातील हुकूमशाहीला रोखण्यासाठी स्वाभिमानी महाराष्ट्र घडवण्यासाठी युवकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.
ते पुढे बोलताना म्हणाले की माढा लोकसभेसाठी भाजपाकडून मोहिते-पाटील उमेदवारी मागत आहेत.
मात्र विद्यमान खासदार यांच्या बाजूने सर्व आमदार असल्याचे चित्र भाजपा निर्माण करत आहे.
यावरून पक्षातील मतभेद दिसून येत आहेत.
महादेव जानकर यांनीही माढ्यातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र त्यांनी कामाच्या जोरावर उमेदवारी मागावी असा सल्ला जगताप यांनी यावेळी दिला.