शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ मिळण्यासाठी फार्मिंग एअरपोर्टची गरज : मंत्री तानाजी सावंत
पंढरपूर येथील राज्यस्तरीय भारत कृषी महोत्सवाचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते उद्घाटन.
कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन, कृषी,डेअरी व पशुपक्षी प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
पंढरपूर/प्रतिनिधी
स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय भारत कृषी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले.
सुरुवातीला स्व. आमदार भारतनाना भालके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी बोलताना आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत म्हणाले की
स्वर्गीय आमदार भारतनाना भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील दिलखुलास नेते होते. जनतेच्या हितासाठी शेवटपर्यंत त्यांनी काम केले. नाना सध्या असते तर पंढरपूरचे चित्र वेगळेच पहावयास मिळाले असते असे उद्गार काढत स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या आठवणींना उजाळा दिला.
पुढे बोलताना ते म्हणाले की
शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी राज्य सरकार काम करत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ मिळण्यासाठी फार्मिंग एअरपोर्ट केले पाहिजे अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचे सांगितले.
नागरिकांची घरे उध्वस्त न करता पंढरपूर येथील नागरिकांना विश्वासात घेऊनच विकास कामे करावीत. त्या अगोदर भीमा नदीची स्वच्छता याचबरोबर अनेक असलेली प्रलंबित कामे करण्याची गरज असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी राजकारणातील अनेक किसे सांगितले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन केल्याने भगीरथ भालके यांना शुभेच्छा दिल्या.
सुरुवातीला प्रस्तावनेत भगीरथ भालके यांनी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांनी केलेल्या कामांची आठवण करून देत
मंगळवेढाचा ३५ गावचा पाणी प्रश्न मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली.
याचबरोबर पंढरपूर कॅरिडॉर बाबत नागरिकांना विश्वासात घेऊन काम करावे.
आगामी काळात योग्य प्रमाणावर पाण्याचे वाटप व्हावे.शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून प्रलंबित कामे मार्गी लावण्याची विनंती भगीरथ भालके यांनी सावंत यांच्या कडे केली.
यावेळी आमदार यशवंत माने, कल्याणराव काळे, गणेश पाटील,अमोल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर हे होते. तर व्यासपीठावर मोहोळचे आमदार यशवंत माने, शिवसेना सोलापूर संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत, शिवसेनेचे अमोल शिंदे, पुरोगामी आघाडीचे डॉ.बाबासाहेब देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश पाटील, युवराज पाटील, मा.व्हाईस चेअरमन विठ्ठल सहकारी साखर कारखाना लक्ष्मण पवार, चंद्रकांत भालके आदींसह पंढरपूर,मंगळवेढा व सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शुक्रवार दिनांक २३ ते २६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान भारत कृषी महोत्सवाचे आयोजन येथील रेल्वे मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे.
या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन, पशुपक्षी प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन शेतकरी आणि नागरिकांसाठी करण्यात आली आहे.