सोलापूरकरांचा उदंड प्रतिसाद : नागरिकांनी दिली अबकी बार ४०० पार ची घोषणा
सोलापूर / प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरसह महाराष्ट्र आणि देशभरात झालेल्या विकासावर चर्चा करीत भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शुक्रवारी ‘विकास की बात मॉर्निंग वॉक के साथ’ या संवाद कार्यक्रमादरम्यान नागरिकांच्या भेटी घेतल्या. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिराच्या भोवती असलेल्या तलावालगतच्या वॉकिंग ट्रॅकवर हा कार्यक्रम झाला.
यावेळी सकाळी फिरायला आलेल्या सोलापूरकरांशी आमदार राम सातपुते यांनी संवाद साधत चर्चा केली. तसेच सोलापूरच्या विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची भरभरून प्रशंसा करत संपूर्ण सोलापूरकर मोठ्या ताकदीने भाजप व महायुतीच्या पाठीशी असल्याचे ठामपणे सांगितले. यावेळी अनेक तरुण, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक यांच्याशी संवाद साधत आमदार राम सातपुते यांनी सोलापूरकरांना विकासाची हमी दिली.
यावेळी आमदार राम सातपुते म्हणाले, सोलापुरात आयटी पार्क आणणे, सोलापूरकरांना दररोज पाणी देणे, युवकांना सोलापुरातच नोकऱ्या मिळवून देणे, गारमेंट पार्क, वर्ल्ड एगझिबिशन सेंटर, एमआयडीसीतील सुविधा, व्यापाऱ्यांसाठी सुविधा देणे असे आमच्या अजेंड्यावरील विषय आहेत. आगामी काळात ते पूर्ण करण्याला प्राधान्य राहणार आहे, असे अभिवचनही आमदार राम सातपुते यांनी याप्रसंगी दिले. याप्रसंगी आ. राम सातपुते यांनी खंदक बागेत नागरिकांसमवेत बॅडमिंटन खेळण्याचाही आनंद लुटला.
तुम्ही टीका करा आम्ही विकास करतो…
विरोधक भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. याबाबत आमदार राम सातपुते म्हणाले, तुम्ही माझ्यावर टीका करा, आम्ही भाजपाने केलेली पाच कामे सांगू. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करा, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली २५ विकासकामे सांगू. तुम्ही भाजपवर टीका करा, आम्ही भाजपाने केलेली हजारो विकासकामे सांगू. कोणी कितीही टीका केली तरी भाजप विकासकामाच्या मार्गावरून हटणार नाही. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरा शेजारील वॉकिंग ट्रॅकदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारनेच बनविला आहे, असेही आमदार राम सातपुते म्हणाले.
चाय पे चर्चा……
मॉर्निंग वॉकनंतर आमदार राम सातपुते यांनी नागरिकांसोबत चहा घेत ‘चाय पे चर्चा’ केली. यावेळी आमदार राम सातपुते यांच्याशी चर्चा करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.