स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त कृषी प्रदर्शन
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कृषी महोत्सवाचे निमंत्रण
लोकनायक पंढरपूर/ प्रतिनिधी
स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे राज्यस्तरीय कृषी, डेरी व पशुपक्षी प्रदर्शन या भारत कृषी महोत्सव २०२४ चे आयोजन लोकनेते आमदार भारतनाना भालके फाउंडेशन पंढरपूर-मंगळवेढा व साईश्री ऍग्रो फार्मसी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील रेल्वे मैदान येथे शुक्रवार दि.२३ ते २६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान करण्यात आले असल्याची माहिती कृषी महोत्सवाचे निमंत्रक भगीरथ भालके यांनी दिली.
सोमवारी रेल्वे मैदान येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य आशा शामियाण्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुधीर धोत्रे, नगरसेवक महादेव धोत्रे, नगरसेवक लखन चौगुले, माजी नगरसेवक महम्मद वस्ताद,संजय बंदपट्टे, सतीश शिंदे, राहुल साबळे, मुन्ना मलपे, दत्ता भोसले यांच्यासह युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
या राज्यस्तरीय कृषी महोत्सवामध्ये पशुपक्षी संवर्धनासाठी तसेच शेती विषयक विविध प्रकारचे अत्याधुनिक उपकरनानांची माहिती व प्रदर्शन रेल्वे ग्राउंड या ठिकाणी करण्यात आले आहे .संपूर्ण जिल्ह्यातील तसेच अन्य जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना शेतीविषयक तसेच पशुधनाबाबत सखोल माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे.
या भारत कृषी प्रदर्शनामध्ये खिलार गाईचे संगोपन तसेच खिलार गाईचे संगोपन कसे केले जावे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. याचप्रमाणे दुग्ध व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन, याचबरोबर विविध पशुपक्षी हे देखील शेतकरी बांधवांना व नागरिकांना पाहायला मिळणार आहेत.
श्वानप्रेमी बांधवांना या कृषी प्रदर्शनामध्ये डॉग शो व कॅट शोचे आयोजन केलेले आहे.
राज्यभरातील विविध जातीच्या श्वानानांचे दर्शन श्वानप्रेमींना होणार आहे.
महिला माता- भगिनींसाठी खास असे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन हि या कार्यक्रमात करण्यात आले आहे.
यामध्ये खेळ पैठणीचा, हळदी-कुंकू या कार्यक्रमासोबतच ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या कार्यक्रमाचे देखील आयोजन केलेले आहे.
भारत कृषी प्रदर्शन या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना देखील निमंत्रण दिले असून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती भगीरथ भालके यांनी दिली.