भाजपच्या अनागोंदी कारभारावर साधला निशान
सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेवर तसेच केंद्रात एकहाती १० वर्षे सत्ता असताना देखील भाजपला विकास साधता आला नाही. सगळीकडे भाजपचा भोंगळ कारभार सुरू असल्याची टीका सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली. प्रणिती यांनी आज (शुक्रवारी) सकाळी सोलापूर महानगरपालिकेच्या आवारात मार्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
यावेळी बोलताना प्रणिती म्हणाल्या, महानगरपालिकेचा कार्यकाळ संपून २ वर्षे झाली. अद्याप निवडणूकीचा पत्ता नाही. प्रशासक नेमले गेले आहेत. त्यामुळे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. पाण्याच्या नियोजनाचा तर बोजवारा उडाला आहे. शहरात आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. ते देखील पाणी अशुध्द आहे. हद्दवाड तसेच पूर्व भागात तर रात्री १-२ वाजता अचानक पाणी सोडले जाते. त्यामुळे तेथील नागरिकांना पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. विमानसेवेचा पत्ता नाही. उद्याच विमान लँड करणार असल्याचा आव आणत घाई गडबडीत चिमणी पाडली. तेव्हाच मी म्हटले होते. पुढील सहा महिने विमानसेवा सुरू होणार नाही, आता सात महिने होत आले असल्याचा टोला देखील प्रणिती शिंदे यांनी यावेळी लगावला.
सोलापूर महानगर पालिकेचा उपक्रम असलेल्या परिवहन सेवेचा बोजवारा उडाला आहे. भाजपचे लोकं फक्त आश्वासन देतात त्याची पूर्तता करत नाहीत. आत्ता तर भाजपचे लोकं उघडपणे संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. ही गंभीर बाब आहे. आपली लोकशाही धोक्यात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला निवडून द्या, असे आवाहन प्रणिती यांनी यावेळी केले.