पाणी पुरवठा करण्याच्या सामाजिक कार्याला आचारसंहितेमधून मुभा मिळावी यासाठी महविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र
पंढरपूर/प्रतिनिधी
सोलापूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातच लोकसभा निवडणुका असल्याने स्वयंसेवी आणि सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना पाणी पुरवठा करण्याच्या कामात आचारसंहितेचा अडथळा निर्माण होणार होता. मात्र पाणी पुरवठा करण्याच्या सामाजिक कार्याला आचारसंहितेमधून मुभा मिळावी यासाठी महविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहले होते. त्या पत्राची दखल घेत आयोगाने ग्रामीण भागात टँकरच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांना आचारसंहितेच्या नियमांतर्गत पाणी वाटपासाठी मुभा देण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.
लोकसभा निवडणुका ऐन उन्हाळ्यात आल्या आहेत. त्यातच शहर आणि ग्रामीण भागात यंदा दुष्काळाचे सावट असून मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक भागात टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करणे गरजेचे होतं. यासाठी काही सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांकडून पुढाकार घेत पाणीपुरवठा केला जातो. मात्र यावेळी निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे अशा प्रकारच्या समाजसेवेला निर्बंध येत होते. मात्र निवडणुकीच्या काळात नागरिकांना पाणी मिळायला हवे ही बाब लक्षात घेत, पाण्यावाचून जनतेची अडचण होऊ नये यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक आयोगाला टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासंदर्भात आचारसंहितेमधून मुभा देण्यासाठी पत्र लिहून मागणी केली होती.
प्रणिती शिंदे यांनी केलेल्या मागणीला यश मिळाले असून निवडणूक आयोगाने सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना भारत निवडणूक आयोगाव्दारे देण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन, आणि आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेवून आपल्या स्तरावर टंचाईग्रस्त भागात टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याच्या सामाजिक कार्यास आचारसंहितेमधून मुभा देण्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याची सूचना केली आहे.
आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणुका असल्या तरी ग्रामीण भागात पाण्याच्या टंचाईमुळे सर्वसामान्य जनतेला केवळ आचारसंहितेमुळे पाण्याची समस्या भेडसावू नये म्हणून केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. प्रणिती शिंदे यांचे प्रयत्न आणि आयोगाने दिलेल्या परवानगीमुळे ग्रामीण भागात टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करता येणार आहे. यामुळे नागरी वस्तीसह ग्रामीण भागात जनावरांसाठीही पिण्याच पाणी उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.