महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार रॉकी बंगाळे यांनी बैलगाडीतून येऊन भरला उमेदवारी अर्ज
पंढरपूर /प्रतिनिधी
मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून महायुतीच्या वतीने विद्यमान आमदार यशवंत माने यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यानंतर शुक्रवारी महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार रॉकी बंगाळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना अभिवादन करून मोहोळचे ग्रामदैवत नागनाथ देवाचे दर्शन घेऊन शक्ती प्रदर्शन करत बैलगाडीतून येऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.राजकीय हालचालींना वेग आला असून कोणत्याही क्षणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे रॉकी बंगाळे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. रॉकी बंगाळे यांना मतदारसंघातील नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याने मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघात दिवसेंदिवस मोठी चुरस पहावयास मिळत असल्याने प्रस्थापित महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी जोरदार लढत पहावयास मिळणार आहे.