पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर येथील ६५ एकर परिसरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे.
पहाटे मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या नागरिकांवर तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह दुचाकीस्वारांवर कुत्रे हल्ले करीत आहेत. कुत्रे मागे लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटून दुचाकीस्वरांचे अनेक अपघातही होत आहेत.
या मोकाट कुत्र्यांचा पंढरपूर नगरपालिकेने बंदोबस्त करावा अशी मागणी समाजसेवक संजयबाबा ननवरे यांनी नगरपालिका प्रशासनाकडे ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेऊन व्हिडिओद्वारे केली आहे.
गेली काही दिवसांपासून ६५ एकर परिसरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे.
त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांमध्ये तसेच मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
या परिसरात प्रशासनाकडून पंढरपुरात येणाऱ्या भाविकांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे.
यामुळे या ठिकाणी कायम भाविकांची वर्दळ असते पुढे आषाढी यात्रा असल्याने या परिसरात मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असतात ही बाब लक्षात घेऊन नगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पुढे येत आहे.